Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

kalinka q Kalinka Mata Temple : ३४६ वर्षांचा वारसा जपणारे वाढोण्याचे कालिंका माता मंदिर

हिमायतनगर (वाढोणा) तालुक्यातील वाढोणा हे छोटेसे गाव, परंतु येथे उभे असलेले कालिंका माता मंदिर भक्तांसाठी प्रचंड आकर्षणाचे केंद्र आहे. यावर्षी या मंदिराला स्थापनेची तब्बल ३४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच विदर्भ-मराठवाड्यातील भाविकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे एक प्रमुख शक्तीपीठ मानले जाते.

स्थापत्य आणि इतिहास
वाढोण्याच्या उत्तरेस असलेल्या या मंदिराचा इतिहास चालुक्यकालीन वारशाशी जोडलेला आहे. हेमाडपंथी शैलीतील शिळांवरून मंदिराची प्राचीनता स्पष्ट होते. सन १६७९ मध्ये कोळसेगिरी ऋषींच्या मार्गदर्शनाखाली एका वडाच्या झाडाखाली दडलेली अष्टभुजाधारी काळ्या पाषाणातील मूर्ती शोधून काढली. गावकऱ्यांनी हेमाडपंथी मंदिर उभारून तिची प्रतिष्ठापना केली आणि तेव्हापासून हे ठिकाण ‘कालिंका माता मंदिर’ म्हणून प्रसिद्ध झाले.

मूर्तीचे वैशिष्ट्य
पाच फूट तीन इंच उंच व तीन फूट रुंद अशी ही मूर्ती उत्कृष्ट कलाकुसरीचे दर्शन घडवते. हातात त्रिशूल, तलवार, घंटा आणि बाजूला उभा सिंह या मूर्तीचे दैदीप्यमान स्वरूप पाहून भक्त विस्मयचकित होतात. महिषासुर मर्दिनीसारख्या तेजस्वी रूपात उभी असलेली ही माता आजही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

नवरात्रोत्सवाचे महत्व
अश्विन शुद्ध प्रतिपदेला येथे नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होताच वाढोणा आणि परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघतो. दररोज मातेच्या आरत्या, गोंधळ, दांडिया, भजन, कीर्तन, झाक्या, रांगोळी स्पर्धा यामुळे गावाचे वातावरण उत्सवमय होते. हिरवी साडी, चोळी, बांगड्या, नारळ यांसह भक्त देवीला ओटी भरून आपल्या मनोकामना व्यक्त करतात. मराठवाडा व विदर्भासोबतच सीमाभागातील हजारो भाविक या काळात दर्शनासाठी गर्दी करतात.

नवमीचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन
नवमीच्या दिवशी मंदिरात होमहवन केला जातो. त्यावेळी अर्चक पुजारी दत्ता महाराज भारती यांच्या वारसच्या अंगात देवीचा अविष्कार होतो आणि ते अग्नीतून उडी घेतात. हे दृश्य पाहण्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहतात. शतकांपूर्वी प्रचलित असलेली बळीप्रथा थांबवून मागील काही ५० वर्षपासून ठाकूर कुटुंबातील मानकऱ्याच्या हस्ते कोहळ्याचा बळी दिला जातो.

विजयादशमी आणि सीमोल्लंघन
विजयादशमीचा दिवस या मंदिरासाठी खास मानला जातो. देवीचा विजय सोहळा, मिरवणुका आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम शेकडो वर्षांपासून अविरतपणे चालू आहे. महिषासुराचा वध करून देवीने ‘विजया’ हे नाव धारण केले म्हणून दशमीला विजयादशमी म्हणतात, अशी आख्यायिका येथे जिवंत परंपरेतून दिसते. प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केल्याच्या विजयाची आठवणही या उत्सवातून जागविली जाते.

सामाजिक आणि सांस्कृतिक एकात्मता
कालिंका माता मंदिर फक्त धार्मिक केंद्र नाही तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे. सर्व जातीधर्मातील लोक येथे एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. नवरात्रोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नव्या पिढीला परंपरेशी जोडले जाते, तर देवीभक्तांच्या मनातील श्रद्धा एकात्मतेची भावना बळकट करते. त्यामुळे हिमायतनगर (वाढोणा) शहरातील हिंदू-मुस्लिम व सर्व जाती धर्माची एकतेचि परंपरा टिकून आहे.

कालिंका माता मंदिर श्रद्धेचे, ऐक्याचे आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक
३४६ वर्षांचा वारसा जपणारे हे मंदिर आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आणि सामाजिक-सांस्कृतिक जीवनाला ऊर्जा देणारे ठिकाण आहे. नवरात्रोत्सव, विजयादशमी आणि दर मंगळवारची पूजा-अर्चा या सर्वामुळे वाढोणा येथील कालिंका माता मंदिर श्रद्धेचे, ऐक्याचे आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक ठरले आहे.

✍️ अनिल मादसवार, हिमायतनगर, संपर्क मो.९७६७१२१२१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top