नांदेड| मनोज जरांगे पाटील हे नुकतेच मराठवाडा दौऱ्यावर निघाले असून 29 ऑगस्ट च्या मुंबई येथिल आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनाच्या तयारीच्या अनुषंगाने मराठवाड्यासह संबंध महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी चावडी बैठकीचे आयोजन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.


नांदेड जिल्ह्यात देखील गावा गावात, सर्कल, तालुका, प्रत्येक विधानसभा क्षेत्रात चावडी बैठकी पार पडत आहेत. नांदेड जिल्हा हा चळवळी चा जिल्हा त्यातच मनोज जरांगे पाटील यांचा चाहता वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मुंबई साठी जाण्याची संख्या ही मोठी असणार त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी जरांगे पाटील 15 ऑगस्ट रोजी नांदेड मध्ये शासकीय विश्रामगृह येथे सर्व समाजबांधवांच्या गाठी भेटी घेऊन आढाव घेणार आहेत.



त्याच पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाज नांदेड यांची हनुमान मंदिर मंगल कार्यालय, विजय नगर नांदेड येथे नियोजन बैठक पार पडली व सदरील बैठकीत 15 ऑगस्ट ला नांदेड जिल्ह्यातील जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचे चोख नियोजन करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. मनोज जरांगे पाटील हे 14 ऑगस्ट रोजी लोहा मार्ग नांदेडला येतील रात्री मुक्कामाला शासकीय विश्रामगृह येथे पोहचून अराम करतील व 15 ऑगस्ट रोजी सकाळी 09 वाजता पासून ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांच्या गाठी भेटी घेतील.



महिला भगिनीचा रक्षा बंधन कार्यक्रम,मराठा डॉक्टर्स यांचे मराठा मेडिकोज, मराठा वकील बांधव, शासकीय कर्मचारी, आत्महत्या ग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या भेटी व सर्व सामाजिक संघटनाचे विविध पदाधिकारी, समाजातील सर्व क्षेत्रातील बांधवांच्या भेटी घेऊन यांच्यासोबत सविस्तर चर्चा करीत, पत्रकार बांधवासोबत वार्तालाप करून 16 तालुक्यांचा आढावा घेण्यात येईल. सोळा तालुक्यातील समाज बांधवांनी आपल्या तालुक्यातील गावातील आढावा घेऊन जरांगे पाटलाच्या भेटीस उपस्थित राहावे.सायंकाळी 6 वाजता अर्धापूर मार्गे हिंगोली कडे रवाना होतील. अशी माहिती बैठक घेऊन सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी दिली.



