नांदेड| अलीकडील अतिवृष्टी आणि पूरामुळे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीत सर्वस्व गमावलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी जमीयत उलमा-ए-हिंद (अर्शद मदनी) नांदेड शाखेतर्फे आज ए.आर. गार्डन, मोजमपेठ येथे 2000 राशन किटचे वाटप करण्यात आले.


या कार्यक्रमाचे उद्घाटन पूरग्रस्तांच्या परिस्थितीवरील माहिती व मदतीच्या कार्यपद्धतीच्या विवेचनाने झाले. या वेळी विशेष अतिथी तहसीलदार संजय वर्कड आणि पुरवठा अधिकारी राठोड उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जमीयत उलमा-ए-हिंद नांदेड जिल्हाध्यक्ष हाफिज अब्दुल हफीज यांनी भूषविले.


कार्यक्रमास शहराध्यक्ष काजी मोहम्मद रफिक, हाफिज सलीम मिली, हाफिज जावेद, हाफिज ईसा, मौलाना सादिक इशाती, हाफिज अब्दुल जब्बार, हाफिज गाउस, मौलाना अनीस, हाफिज सईद, हाफिज अन्वर, मुफ्ती इजहाजुल हक कासमी, हाफिज अब्दुल कलीम, हाफिज खलील अहमद, मोहम्मद अब्दुल मुईज, हाफिज मोहम्मद खालिद, उबेद लाला, हुदैफा शाहिद, अब्दुस्सलाम हाफिज तसेच जमीयतचे इतर सदस्य उपस्थित होते.


कार्यक्रमादरम्यान आयोजकांनी सांगितले की, अलीकडील पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून काही कुटुंबे बेघर झाली आहेत. या काळात अनेक नागरिकांचे राशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड व मुलांचे जन्म प्रमाणपत्र यांसारखे महत्त्वाचे कागदपत्रे वाहून गेली आहेत.


जिल्हाध्यक्ष हाफिज अब्दुल हफीज यांनी तहसीलदार संजय वर्कडयांच्याकडे पूरग्रस्तांचे कागदपत्रे पुन्हा मिळविण्यासाठी आणि आवश्यक शासकीय मदतीसाठी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
तहसीलदारांनी पूरग्रस्तांबद्दल सहानुभूती व्यक्त करत सांगितले, “मी तुमच्या अडचणी समजतो, तुम्ही माझ्याकडे या — जे काही शक्य आहे ते मदत मी नक्की करेन.” तसेच प्रशासन पूरग्रस्तांच्या कागदपत्रांच्या पुनर्प्राप्तीसाठी आणि आवश्यक शासकीय सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी जमीयत उलमा-ए-हिंदच्या समाजसेवेचे सर्व उपस्थितांनी कौतुक केले. संस्था नेहमी संकटात सापडलेल्या प्रत्येक घटकाच्या सोबत उभी राहते, असे मत व्यक्त करण्यात आले.


