हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र शासनाने दि. २ सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजातील व्यक्तींना मराठी कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र (OBC reservation) मिळवून देण्याचा मार्ग खुला केला आहे. या निर्णयाचा हिमायतनगर तालुक्यात ओबीसी समाजबांधवांनी जाहीर निषेध नोंदवत तीव्र विरोध केला.


फक्त निषेधच नाही तर शासनाने काढलेल्या अन्यायकारक अध्यादेशाची होळी करून ओबीसी समाजाने आपला रोष व्यक्त केला. यावेळी शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. ओबीसी समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक, बेकायदेशीर व असंवैधानिक ( Inclusion of Maratha community in OBC reservation is unfair) आहे. यामुळे ओबीसी समाजातील सुमारे ४०० हून अधिक जातींच्या हक्कांवर गदा येणार असून, शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रातील त्यांचे प्रतिनिधित्व धोक्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १५(४) व १६(४) नुसार आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीच आहे. मराठा समाजाचा समावेश हा या तत्त्वांचा भंग आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयीन निर्णयांचे उल्लंघन करून केवळ राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.



बुधवारी हिमायतनगर सकल ओबीसी समाजाने शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत तहसीलदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व, हक्क व आरक्षण संरक्षित राहावे यासाठी शासनाने ठोस धोरण जाहीर करावे. ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्याय्यकारक समावेश होऊ नये. अशी मागणी करत जारी करण्यात आलेल्या अन्यायकारक जि.आर. ची होळी केली. तात्काळ शासन निर्णय मागे घेतला नाही, तर व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.


यावेळी ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीचे तालुकाध्यक्ष बाबाराव जरगेवाड, खंडूजी माधवराव काळे, दिलीप आला राठोड, प्रभाकर मुधोळकर, सुभाष शिंदे, मायंबा होळकर, सदाशिव सातव, बाबूराव होनमने पाटील, अशोक अनगुलवार, निलेश चटणे, अभिषेक बक्केवाड, दिनेश राठोड, लक्ष्मण जाधव, नारायण देवकते, अशोक आच्चमवाड, श्याम जक्कलवाड, प्रकाश हाके पाटील, आनंद मुतनेपाड, सदाशिव काळे, राम नरवाडे, सचिन धोंडू पाटील, दत्ता देवकते, आदींसह शेकडो ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.

