हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असून, याचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचा गंभीर मुद्दा पुढे आला आहे.


या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. एकूण १२५ विद्यार्थी असताना, सध्या केवळ ४ शिक्षकांवर सात वर्गांचा भार आहे. त्यामुळे सर्व वर्गांना आवश्यक वेळ देणे अशक्य होत असून, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असून, पालकांमध्येही तीव्र नाराजी आहे. काही पालक शिक्षकअभावी शाळेत शिक्षणाचा दर्जा खालावल्याने मुलांना शाळेत न पाठवता थेट शेतकामासाठी सोबत नेत असल्याचे चित्र आहे. परिणामी शाळागळतीचे प्रमाण वाढत असून, भविष्यात साक्षरतेचे प्रमाण घटण्याचा धोका निर्माण झाला आहे, जी बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले.


या प्रकरणाकडे शिक्षण विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. ही बाब गांभीर्याने घेत मंगरूळचे उपसरपंच तथा उप-जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) संतोष आंबेकर यांनी जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांची भेट घेऊन शाळेत तातडीने २ शिक्षकांची नेमणूक करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला असून, “जर त्वरित शिक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही, तर या विषयास न्याय मिळवून देण्यासाठी संविधानिक मार्गाने पुढील भूमिका घ्यावी लागेल,” असे उपसरपंच संतोष आंबेकर यांनी सांगितले.
शिक्षणाचा पाया भक्कम नसेल तर भविष्यातील पिढी अडचणीत येईल. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील शिक्षक कमतरतेकडे शिक्षण विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक असल्याची जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.

