तामसा/हदगांव| नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेला वेग आला असून, तामसा पोलिसांनी अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडून ₹93,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दि. २४ जुलै २०२६ रोजी तामसा पोलिसांचे पथक गस्तीवर असताना तामसा–नांदेड रोडवरील टोलनाका परिसरात दोन जण मोटारसायकलवरून अवैध देशी दारूची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.


माहितीची खातरजमा करून पंचांसमक्ष पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी अतुल देवराव हटकर (वय ४२, रा. तामसा) आणि शेख सलीम हाजी (वय ४३, रा. तामसा) हे दोघे होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच २६ सीएस ६११०) वरून अवैध देशी दारू विक्री करताना आढळून आले.



पोलिसांनी त्यांच्याकडून १८० मिली क्षमतेच्या भिंगरी संत्रा ब्रँडच्या २४० बाटल्या (किंमत ₹१९,२००), ९० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या १०० बाटल्या (किंमत ₹४,०००) तसेच होंडा शाईन मोटारसायकल (किंमत ₹७०,०००) असा एकूण ₹९३,२०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १२९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास तामसा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सहदेव खेडकर आणि पोलीस अंमलदार चक्रधर पवार यांनी केली. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अवैध दारू विक्री, वाहतूक, साठवणूक तसेच इतर अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

