नवी दिल्ली| नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे 5 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीत आयोजित सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 चे उद्घाटन केंद्रीय कृषी व किसान कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते झाले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील स्वयंसहाय्यता गटांनी ‘व्होकल फॉर लोकल आणि ‘स्वदेशी अपनाओ’ या संकल्पनांना चालना देणारे खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांचे स्टॉल आहेत. आज महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आर. विमला यांनी सरस जीवनोपार्जन मेळावा 2025 ला भेट देऊन पाहणी केली.


श्रीमती आर. विमला यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन तिथल्या उत्पादनांची बारकाईने पाहणी केली आणि अनेक उत्पादने खरेदी करून या गटांच्या कार्याला प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादन प्रक्रिया, आव्हाने आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा केली. त्यांनी या गटांच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचा सल्लाही दिला. यावेळी महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवास आयुक्त स्मिता शेलार व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्र. उपसंचालक मनिषा पिंगळे देखील उपस्थित होत्या.


केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत आयोजित या मेळाव्यात देशभरातील 400 हून अधिक ‘लखपति दीदीनी आपली उत्पादने प्रदर्शित केली. महाराष्ट्रातील 9 स्टॉल्सनी ‘स्वदेशी अपनाओ’च्या भावनेने खाद्यपदार्थ आणि हस्तकला उत्पादनांद्वारे राज्याची समृद्ध संस्कृती सादर केली. राजमाता जिजाऊ महिला उमेद गटाने सेंद्रिय डाळी, चिली पावडर आणि नैसर्गिक अन्नपदार्थ सादर करून खवय्यांचे मन जिंकले आहे. जय मल्हार महिला स्वयंसहाय्यता गटाच्या घरगुती आंबा व मिश्र लोणच्यांना मोठी मागणी मिळत आहे. रुक्मिणी महिला बचत गटाने पारंपारिक कोल्हापुरी चप्पलांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवली आहे, तर वारली आर्ट्स गटाच्या वारली चित्रांना आणि पेन होल्डर्सना दिल्लीकरांचे आकर्षण मिळत आहे.


तुळजाभवानी स्वयंसहाय्यता गटाच्या नाविन्यपूर्ण लाकडी हस्तकला व नाव प्लेट्सना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. भैरवनाथ गटाच्या सुगंधी अगरबत्ती आणि धूप यांना विशेष लोकप्रियता मिळत आहे. ओम साई महिला बचत गटाच्या कोकणातील काजू आणि आंबा पदार्थांनी खवय्यांना भुरळ घातली आहे, तर कोहिनुर महिला गटाच्या रंगीत हातमाग कालीन आणि बेडशीट्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाग्यलक्ष्मी गटाने खास महाराष्ट्रीयन पुरणपोळी, वडापाव आणि विविध पारंपरिक पदार्थ सादर केले असून, हे पदार्थ चवीने आस्वादत दिल्लीकरांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची चव अनुभवायला मिळत आहे. हा मेळावा 22 सप्टेंबर 2025 पर्यंत मेजर ध्यानचंद स्टेडियम, नवी दिल्ली येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुला आहे. प्रत्येक स्टॉलला उत्तम प्रतिसाद मिळत असून, हा मेळावा ग्रामीण भारताच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे.




