नांदेड| “हिंद-दी-चादर” उपक्रमांतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त नांदेड येथे आयोजित भव्य समागम कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. “वाहे गुरु” आणि “बोले सो निहाल, सत श्री अकाल”च्या जयघोषात लाखो भाविकांनी श्री गुरु ग्रंथसाहिबजी यांचे पावन दर्शन घेतले.


दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच मोदी मैदान परिसरात दर्शनासाठी लांबलचक रांगा लागल्या होत्या. भक्ती, श्रद्धा आणि शिस्त यांचे अद्वितीय दर्शन या ठिकाणी पाहायला मिळाले असून संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारलेला आहे.

या शहीदी समागमासाठी देशाच्या विविध राज्यांतून तसेच सर्व धर्मांतील भाविक नांदेडमध्ये दाखल झाले असून शांतता व परस्पर सन्मान राखत सर्वजण दर्शनाचा लाभ घेत आहेत. हा समागम केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक एकतेचे प्रतीक ठरत आहे.


भाविकांच्या सोयीसाठी आयोजकांच्या वतीने चोख नियोजन करण्यात आले आहे. स्वयंसेवक व सेवाभावी संस्थांच्या सहकार्यामुळे दर्शन, लंगर व इतर सुविधा सुरळीतपणे सुरू आहेत. भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविक दररोज प्रसादाचा लाभ घेत आहेत. यासोबतच गुरुद्वारातर्फे अखंड कीर्तन सेवा अखंडपणे सुरू आहे.


कार्यक्रमस्थळी लोकसहभागातून चहा, अल्पोपहार, ज्यूस आदींचे विविध सेवा स्टॉल उभारण्यात आले असून भाविकांना विनामूल्य सेवा दिली जात आहे. सेवाभावातून उभा राहिलेला हा उपक्रम उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या शहीदी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा आणि मानवतेच्या महान विचारांचा जागर करण्यात येत असून, समाजात बंधुता, समता व एकतेचा सशक्त संदेश दिला जात आहे.

