हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीने नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल आणि परमेश्वर बसस्थानक परिसरातील घाण सकाळी ९ वाजता स्वच्छता विभागाच्या वाहन व कर्मचाऱ्यांमार्फत उचलली आहे.


नगरपंचायतीचे स्वच्छता विभाग प्रमुख श्री. बोकारे यांनी सांगितले की, शहरातील मुख्य चौकात घाण होणार नाही यासाठी शहरातील सर्व नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजचे आहे. नागरिकांनी वारंवार रस्त्यावर घाण न टाकता ती एका डब्यात किंवा बकेटमध्ये जमा करून नगरपंचायतीच्या वाहनातच टाकावी. असे केल्याने रस्त्यावर घाण व दुर्गंधी पसरणार नाही आणि शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहील.



घरामध्ये केरकचरा जमा करताना नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा जमा करून नगरपंचायतीच्या वाहनात टाकल्यास शहर नीटनेटके होण्यास आणि नागरिकांचे आरोग्य अबाधित राहण्यास मोठी मदत होईल. स्वच्छ शहर – सुंदर शहर ही सर्वांची जबाबदारी आहे, नगरपंचायत शहरातील साफ सफाईसाठी तत्पर आहे, मनुष्यबळ कमी आणि वाहनांची कमतरता असल्याने एकच वेळी १७ वॉर्डातील सफाई होऊ शकत नाही. दिवसाआड स्वच्छता ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या स्वच्छता विभाग प्रमुख श्री. बोकारे यांनी केले.


सोमवार पासून नवरात्र उत्सव सुरु होत आहे, या काळात दुर्गा मातेची आराधना व आरती महापूजेसाठी महिला आंनदलींची वर्दळ असते. या काळात शहराची स्वच्छता ठेवण्यासाठी आमचे कर्मचारी कटिबद्ध राहतील. मात्र नागरिकांनी देखील रस्त्यावर घाण नं टाकता जमा करून नगरपंचायतीच्या घंटा गाडीत टाकल्यास शहराची प्रतिमा उंचावेल आणि नागरिक, भाविक भक्त व यात्रेकरूंना याचा त्रास होणार नाही.


