येल्लारेड्डी/कामारेड्डी, अमृत गोजे| कामारेड्डी जिल्ह्यातील येल्लारेड्डी शहरासह संपूर्ण मंडळात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे अनेक रस्ते तुटले असून, वाहतूक ठप्प झाली आहे.


येल्लारेड्डी शहराबाहेरील वडेरा कॉलनी परिसरात येल्लारेड्डी–कामारेड्डी मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे. ब्राह्मणपल्ली गावाला पूर आल्याने रुद्रराम–येल्लारेड्डी मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच कोट्टल–लक्ष्मपूर पूल पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने तो धोकादायक ठरला असून प्रवाशांना तिथे न जाण्याचा सल्ला अधिकाऱ्यांनी दिला आहे.


दरम्यान, येल्लारेड्डी शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिक मोठ्या अडचणीत आले आहेत. सर्व मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी मध्यरात्री पासून सुरू असलेल्या मेघगर्जनेसह पावसामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला आहे. विनायक चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.



