हिमायतनगर, अनिल मादसवार| रोजगार हमी योजने अंतर्गत मौ. दुधडवाडी/वाळकेवाडी, ता. हिमायतनगर अंतर्गत रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवक गजानन श्यामराव मुतनेवाड उपसरपंच संजय शिवराम माझळकर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक 22 रोजी पडताळणी करून दिनांक 07 रोजी लाच मागणाऱ्या उपसरपंचास ताब्यात घेतले आहे. या लाचखोर ग्रामसेवक व उपसरपंचावर हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या आदिवासी बहुल भागातील 54 वर्षीय तक्रारदार हे त्यांचे रोजगार हमी योजनेअंतर्गत मौ. दुधडवाडी/वाळकेवाडी, ता. हिमायतनगर अंतर्गत रोजगार सेवकाचे मानधन 35,388/- रूपये मिळण्यासाठी ग्रामसेवक गजानन श्यामराव मुतनेवाड, पद ग्रामसेवक, ग्रामपंचायत, मौ. दुधड वाळकेवाडी, ता., हिमायतनगर जि. नांदेड रा. भोकर जि. नांदेड यांना भेटले होते. त्यांनी उपसरपंच संजय शिवराम माझळकर यांना भेटा असे सांगितले. त्यावरून तक्रारदार हे उपसरपंच संजय माझळकर यांना भेटले तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना त्यांचे रोजगार सेवकाचे मानधन त्यांचे बॅंक खात्यात टाकण्यासाठी सुरुवातीला 20,000/- रूपयाची मागणी केली. त्यावेळी तक्रारदार यांनी नाईलाजास्तव होकार दिला. सदरचे 20,000/- रुपये लाच असल्याची तक्रारदार यांना खात्री झाल्याने व त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिनांक 16/10/2024 रोजी याबाबत तक्रार दिली.
सदर तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड यांच्याकडून दिनांक 22/10/2024 रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, लाच मागणी पडताळणी दरम्यान यातील आरोपी उपसरपंच संजय माझळकर यांनी सरपंच यांच्या नावाने स्वतःसाठी 15,000/- रूपये व ग्रामसेवक मुतनेवाड यांच्यासाठी 10,000/- रूपये असे एकूण 25,000/- रुपयाची पंचासमक्ष लाचेची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी उपसरंपच यांना ग्रामसेवक यांना बोलून खात्री करा असे म्हटले असता, उपसरपंच यांनी ग्रामसेवक यांना त्यांचे मोबाईलवर फोन लावून तक्रारदार यांच्या रोजगार सेवकाचे मानधन देण्यासाठी बोलणे केले असता ग्रामसेवक मुतनेवाड यांनी स्वतःसाठी 10,000/-रूपये व उपसरपंच संजय माझळकर यांनी सरपंच यांचे साठी 15,000/- रूपये असे एकूण 25,000/- रुपये लाच मागणी केली. नमुद प्रकरणात पोलीस स्टेशन हिमायतनगर , जि.नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हि कार्यवाही मा.श्री संदीप पालवे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, परिक्षेत्र, नांदेड, मो.क्र. 9545531234 मा.डॉ. संजय तुंगार, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो नांदेड . परिक्षेत्र नांदेड, मो.क्र. 9923701967 , पर्यवेक्षण अधिकारी श्री प्रशांत पवार पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड, मो.क्र. 9870145915 यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्री संदिप थडवे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, नांदेड सापळा कारवाई पथक – अँटी करप्शन ब्युरो टीम, नांदेड.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा. दुरध्वनी 02462-253512 टोल फ्रि क्रमांक 1064