नांदेड | शहरातील महावीर चौक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा बुजविण्यात प्रशासनाला अपयश आल्याने नागरिकांच्या संतापाला वाट मोकळी झाली आहे. वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत सरदार दिलीपसिंघ सोडी यांनी या खड्ड्याला चक्क हार घालून आणि रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.


महावीर चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावर पडलेला खड्डा वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असतानाही संबंधित यंत्रणेकडून त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोडी यांनी खड्ड्यालाच ‘मानाचा’ हार घालत रांगोळी काढली.


खड्डा बुजविण्याऐवजी नागरिकांच्या जीवाशी खेळ? रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, रात्रीच्या वेळी हा खड्डा अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. खड्डे बुजविण्यासाठी निधी आणि यंत्रणा असताना प्रत्यक्षात रस्त्यांची अशी अवस्था का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




प्रशासनाने आता तरी जागे होऊन महावीर चौकातील हा खड्डा तातडीने बुजवावा आणि शहरातील इतर धोकादायक खड्ड्यांचीही पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
खड्ड्याला हार-रांगोळी घालण्याची वेळ नागरिकांवर येत असेल, तर प्रशासन नेमके करते तरी काय?, असा संतप्त सवाल या अनोख्या आंदोलनातून उपस्थित करण्यात आला आहे.

