नवीन नांदेड| वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या नवमतदारांना मतदानाचे महत्व पटवून सांगण्यासाठी नांदेड दक्षिण स्विप उपक्रमा अंतर्गत वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात शुक्रवारी दि. २५ ऑक्टोबर रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आली, विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती विषयीची शपथ घेतली. लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी नवमतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांनी केले.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभेसाठी पोटनिवडणूक दि. २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात मतदारांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड दक्षिण स्विप उपक्रमा अंतर्गत वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार यांच्या मार्गदर्शना खाली शुक्रवारी दि. २५ रोजी महाविद्यालयात मतदार जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, स्वारातीम विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. घनश्याम येळणे, लोकप्रशासन विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. विजय तरोडे, डॉ इंगळे, डॉ. अकोले, डॉ. बडूरे, मनपाचे बालासाहेब कच्छवे, उपप्राचार्य डॉ. व्ही.आर. राठोड, डॉ. पी.बी. बिरादार, डॉ. जी वेणुगोपाल, डॉ. प्रो. नागेश कांबळे, प्रा. पी.बी.चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. घुंगरवार म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत मतदार हा आत्मा आहे. त्यामुळे प्रत्येक नवमतदारांनी मतदान करण्यासाठी पुढे यावे, तसेच इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे.
डॉ. विजय तरोडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणुकीला फार महत्त्व आहे. मतदान मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. भारतीय राज्यघटनेतील कलम ३२६ नुसार आपल्याला मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. ‘एक व्यक्ती – एक मत’ ही संकल्पना घेऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी ‘स्वीप’च्यामाध्यमातून मतदांची जनजागृती करण्यात येत आहे,यावेळी डॉ. इंगळे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती विषयीची शपथ दिली. तसेच मतदान जनजागृती संदर्भात महाविद्यालयात वक्तृत्व, रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. वक्तृत्व स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून मतदान जनजागृती विषयी आपले विचार मांडले. तसेच आम्ही मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला.
मराठी विषय विभाग प्रमुख डॉ. साहेबराव शिंदे यांनी सूत्रसंचालन तर प्रा.शशिकांत हटकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा डॉ.नागेश कांबळे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.