कंधार, सचिन मोरे| देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या राष्ट्रीय सोहळ्यात महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील तांड्यावरील ४ भटक्या महिलांना सहभागी होण्याचा सन्मान प्राप्त झाला आहे.ही बाब निश्चितच भटक्या व विमुक्त जाती-जमातीतील महिलांसाठी अभिमानास्पद असल्याची चर्चा कंधार तालुक्यातील अनेक वाडी तांड्यामधून ऐकावायास मिळत आहे.या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या भटक्या महिलांना केवळ धान फाउंडेशनच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल तालुक्यातील समस्त बंजारा समाजाने धान फाउंडेशनचे आभार व्यक्त केले आहे.


नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनबीसीएफडिसी) आणि एसइइडी प्रोजेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील धान फाउंडेशनच्या सहकार्याने या महिलांना राजधानी दिल्ली येथील ऐतिहासिक लालकिल्ल्यावर प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये उपस्थित राहण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. धान फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून देशातील विविध राज्यांमध्ये सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे.

महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील महिलांना एकत्र करून महिला बचत गट स्थापन करणे, त्यांना आर्थिक साक्षरता देणे, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि सामाजिक सशक्तीकरण घडवून आणणे हे या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना बचत, अंतर्गत कर्जव्यवस्था, लघुउद्योग, कौशल्य प्रशिक्षण तसेच सरकारी व वित्तीय संस्थांशी जोडण्याचे काम प्रभावीपणे करण्यात येते.



नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनबीसीएफडिसी) आणि एसइइडी प्रोजेक्टच्या माध्यमातून या महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे अनेक महिलांनी छोट्या व्यवसायाची सुरुवात करून त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्नात वाढ केली आहे त्याचबरोबर महिलांमध्ये आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित होत आहे.


या उल्लेखनीय कार्याची दखल घेत लाल किल्ल्यावरील प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडचे साक्षीदार होण्याची संधी कंधार तालुक्यातील निर्मला भगवान जाधव ( भोजुतांडा बिजेवाडी) अनुसयाबाई उत्तम चव्हाण ( महादेव तांडा, फुलवळ) राधा भुजंग जाधव(केवळातांडा, फुलवळ ), बायनाबाई बालाजी राठोड (भोजूतांडा ,बिजेवाडी) यांना मिळाली आहे.
आपल्या देशाच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होणे ही केवळ सन्मानाची बाब नसून, भटक्या-विमुक्त समाजाच्या अस्तित्वाची, संघर्षाची आणि प्रगतीची राष्ट्रीय पातळीवरील ओळख आहे. यामुळे कंधार तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर अभिमानाने उंचावले आहे. शिवानंदन (प्रोग्रॅम लिडर) यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल दवणे , कंधार येथील वैभव चव्हाण,ऋषिकेश सोळंके, भोकर येथील साई चव्हाण आणि त्यांची टीम कार्य करत आहे. यामुळे या चार महिलांवर सामाजिक, राजकीय स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
धान फाउंडेशनचा हा उपक्रम सर्वसमावेशक विकास, सामाजिक न्याय आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा आदर्श नमुना ठरत असून, भविष्यात अशा उपक्रमांमुळे भटक्या-विमुक्त समाज मुख्य प्रवाहात अधिक प्रभावीपणे सामील होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

