नांदेड l २० नोव्हेंबर रोजी माहूर तालुक्यातील पचोंदा येथील दोन सख्या जावा असलेल्या दलित कुटुंबातील महिलांची क्रूरपने गळा आवळून खून झाल्याची घटना घडली आहे.यामुळे संपूर्ण समाज हादरला आहे. पोलीस अधीक्षक श्री अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व सपोनि रवी वाहुळे यांच्या पथकाने अवघ्या काही तासात दोन आरोपीना अटक केली आली असून आरोपीनी खून केल्याची कबुली दिली आहे. जलदगती प्रभावाने कार्यवाही केल्यामुळे पोलीस विभागाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.


पचोंदा दुहेरी हत्याकांड (डबल मर्डर) प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी ही मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येत असून पीडित दलित कुटुंबियांना ३० दिवसाच्या आत शासनाने यथोचित मदत करावी यासाठी कॉ.गंगाधर गायकवाड प्रयत्न सुरु केले आहेत.


पचोंदा येथील अंतकलाबाई अशोक अडागळे आणि अनुसयाबाई साहेबराव अडागळे या दोघी जावा शेतात कापूस वेचणीचे काम करीत असताना अरोपी दत्ता सुरेश लींगलवार रा.सदोबा सावळी ता. आर्णी जि.यवतमाळ व गजानन गंगाराम येरजवार रा.गंगाजी नगर ता.माहूर जि.नांदेड या दोघांनी खून केला आहे.
घटना गंभीर असून सीटू कामगार संघटनेने दुःख व्यक्त केले आहे.


सदरील दलित महिला अत्याचार प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोगाने अद्याप घेतली नाही. अनुसूचित जाती,जमाती अत्याचार मदत निधी केंद्र/राज्य शासनाकडून ५ लाख रुपये. मुख्यमंत्री सहायता निधी २ ते ५ लाख रुपये. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहाय्यता २ लाख रुपये. महिला मृत्यू अनुदान, महिला व बाल विकास विभागाकडून १ लाख रुपये मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे.परंतु शासकीय यंत्रणा अजून हालचाल करतांना दिसत नाहीत.

वरील कायदेशीर मदत शासनाने स्वयंस्फुर्त करणे अपेक्षित आहे.यासाठी सीटू च्या वतीने प्रयत्न सुरु केले असून यदाकदाचित शासनाने दुर्लक्ष केले तर सीटू संघटना पूर्ण ताकतीने पीडित कुटुंबियांना मदत करेल, गरज पडल्यास जनहित याचिका दाखल करणार असे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड स्पष्ट केले आहे.


