हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंगळवार दिनांक २४ रोजी दुपारी वाढोणा शहराचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिरास भेट दिली. तसेच मंदिराची इतिहासकालीन पार्श्वभूमी जाणून घेत मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान असलेल्या भगवान श्री परमेश्वर मूर्तीचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर कमेटीच्या वतीने श्रीची प्रतिमा भेट देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्वागत सन्मान करण्यात आला.



पहिल्यांदाच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिमायतनगर येथे भेट दिली. प्रथमतः श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन घेत श्री शिवपती मंदिरातील महादेव, निद्रिस्त नारायण यासह विविध देवी देवतांच्या पुरातन कालीन मुर्त्यांची निरीक्षण केले. तसेच मंदिर परिसराची पाहणी करून मंदिराचा इतिहास जाणून घेतला. यावेळी त्यांनी श्री परमेश्वर मंदिराची स्वच्छता, नीटनेटकेपणा, मंदिरातर्फे राबविण्यात येणारे विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम इतर कामकाजाची माहिती घेत समाधान व्यक्त करून तसा अभिप्राय लिहिला.


यापुढेही मंदिर कमिटी कडून अशाच प्रकारे शहरासह मंदिराच्या वैभवात भर टाकणारे कामे आणि विविध उपक्रम राबविली जावीत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना जमेल तेवढ्या सुविधा उपलब्ध कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.


याप्रसंगी त्यांच्यासोबत हिमायतनगरच्या तहसीलदार तथा मंदिराचे पदसीद्ध अध्यक्ष सौ.पल्लवी टेमकर, मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक लताताई पाध्ये, संचालक मथुराबाई भोयर, संचालक लताताई मुलंगे, संचालक राजाराम झरेवाड, संचालक अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, बाळूअण्णा चवरे, पांडुरंग तुप्तेवार, सुभाष शिंदे, संतोष गाजेवार, पंडित ढोणे, मंडळ अधिकारी, तलाठी आदींसह शहरातील भाविक भक्त नागरिकांची उपस्थिती होती.

