हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर (जि. नांदेड) येथील श्री परमेश्वर मंदिरात धुलिवंदन व रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोरड्या रंगांची उधळण करत भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला.


महाशिवरात्री यात्रा उत्सवही अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या उत्सवात सहकार्य करणारे जवळपास सर्वच नागरिक उपस्थित होते. हलगीच्या तालावर एकमेकांना रंग लावत, पेढे-गाठी भरवून शुभेच्छांची देवाण-घेवाण करण्यात आली.



गावातील युवक व ज्येष्ठांच्या सहकार्याने यात्रा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांचा यावेळी हार व गाठी घालून सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.



प्रेम, एकोपा आणि भक्तिभाव जपत सण साजरा केल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


