किनवट, परमेश्वर पेशवे। पूर्णतः हताश झालेल्या विरोधकांना कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत नेरेटीवचा वापर केला. मोदीचे सरकार संविधान बदलणार असा अपप्रचार करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या या नेरेटिव्हला न घाबरता निर्भीडपणे पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे व विकासात्मक कामे घराघरात पोहोचविण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे आवाहन मराठवाडा संयोजक प्रवीण साले यांनी किनवट येथे केले आहे.


लोकसभेच्या निवडणुका संपन्न होताच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक जिल्ह्यात बूथ सक्षमीकरण व मतदार यादी पुनर्नरीक्षण संदर्भात बैठका नियोजन व रणनीती ठरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 6 जुलै रोजी गोकुंदा येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात भाजपाची व्यापक बैठक संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रवीण साले बोलत होते.


या बैठकीस जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, जिल्हा संयोजक बाबुराव केंद्रे, जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक किशन मिरासे, जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ कराड सर, अविनाश राठोड, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संध्याताई राठोड, किनवट विधानसभा संयोजक गोविंदराव आंकुरवाड, युवक आघाडीचे नांदेड जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, किनवट तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार, माहूर तालुका अध्यक्ष श्रीकांत घोडेकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषाताई धात्रक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले.


प्रवीण साले पुढे म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने महिला व दुर्बल घटकाला प्राधान्य देऊन सर्वांगीण विकासाचा पाया रचला. कलम 370 हटवून जम्मू-काश्मीर मुक्त केले तर आयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर उभारून करोडो हिंदू बांधवांचे स्वप्न साकार केले. उज्वला गॅस योजना, पंतप्रधान घरकुल योजना शेतकरी सन्माननिधी सारख्या महत्वकांक्षी योजनामुळे गोरगरीब दुर्बल घटकाचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावला आहे. भारत देशाची जागतिक महासत्तेकडे सुरू असलेली वाटचाल विरोधकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

महायुतीच्या विजयाची घोडदौड रोखण्याचा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने लोकसभेच्या निवडणुकीत विरोधकांनी जाणीवपूर्वक नेरेटिव्हचा वापर केला. हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संविधान धोक्यात येईल असा अपप्रचार व दिशाभूल करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला.परंतु भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांच्या नेरेटीव न घाबरता निर्भीडपणे पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे मोदी सरकारची भूतपूर्व विकासकामे घराघरात पोहोचविण्यासाठी परिश्रम घ्यावे असे आवाहन प्रवीण साले यांनी केले आहे.
जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी बूथसक्षमीकरण व मतदार यादीतील उनिवाबद्दल माहिती दिली. शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख यांनी स्थलांतरी मतदार, मयत व नव्याने समाविष्ट मतदारांची वेळोवेळी पडताळणी करावी तसेच यादीतील चुका संदर्भात तात्काळ तहसील कार्यालयात तक्रार दाखल करावी. बूथकमिटीने सर्वजाती समूहातील सक्रिय कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घ्यावे व काही फेरबदल अपेक्षित असल्यास तसे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळवावे. जो निष्ठापूर्वक व प्रामाणिकपणे काम करेल अशा कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी देण्यात येईल असे आश्वासन देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे.
प्रस्ताविक भाषणातून जिल्हा संयोजक बाबुराव केंद्रे यांनी लोकसभा निवडणुकीतील आढावा तसेच बूथस्तरावर वरील कार्यकर्त्यांना उद्भवणाऱ्या अडीअडचणी मांडल्या. नांदेड जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी व नियोजन करून विधानसभेत विजयी पताका फडकविणार असल्याचे सांगितले आहे.
या बैठकीला भाजपचे दिनकर चाडावार, जेष्ठ नेते राघू मामा, प्रदीप एडके, श्रीनिवास नेम्मानीवार, अजय चाडावार, दत्ता आडे, कपिल करेवाड, डॉ. नामदेव कराड, विवेक केंद्रे, बालाजी भिसे, स्वागत आयनेनीवार, बाळकृष्ण कदम, पपू अरमाळकर, संतोष कनाके, दत्ता दोनकेवार, सागर पिसारीवार, रमेश बोड्डेवाड, जोतिराम राठोड यांच्यासह किनवट/माहूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे विविध आघाड्यांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते शक्ती केंद्रप्रमुख व बूथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.


