किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट/माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिवसाढवळ्या टपऱ्या, हॉटेल व ढाब्यावर अनधिकृतपणे विदेशी दारू तर गावठी दारुची विक्री होत आहे. काही गावात थेट गावठी दारू काढण्याचे कारखाने पेव फुटल्याचे बोलले जात आहे. हे सर्व घडत असताना यावर नियंत्रण ठेवणारे किनवटचे राज्य उत्पादन शुल्क विभाग रसद गोळा करण्यात मश्गुल असल्याचा आरोप होत आहे.
नांदेड जिल्ह्याचा अंदमान निकोबार संबोधल्या जाणाऱ्या किनवट/माहूर हे तालुके जिल्हा मुख्यालयापासून दीडशे ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. अशात जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून तालुका स्तरावरील अधिकारी यांचा अर्थपूर्ण संबंधातून दारू व्यवसाय जोमात सुरू आहे. मग ते राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या अर्थपूर्ण दुर्लक्ष करून अवैध व्यवसायात प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती उदयास येत आहे. किनवट/माहूर तालुक्यातील आज घडीला दारू विक्रीचे अनुज्ञप्तीधारक दुकाने बोटावर मोजण्या इतकी असताना तालुक्यातील ग्रामपंचायती अंतर्गत गावे वाडी तांडे पाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी गावठी हातभट्टीसह देशी व विदेशी दारू उपलब्ध आहे. कार्यवाही करण्यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी जाऊन कारवाई करणे शक्य नसल्याचे बोलण्यात येते.
परंतु परवानाधारक वार, देशी दारू दुकान, वाईन शॉप याच्या नूतनीकरणाच्या वेळेस व महिन्याच्या विशिष्ट तारखेला प्रतिनिधी पाठवून रसद गोळा करण्याचे कर्तव्य मात्र हे लोकं नित्यनियमाने पार पाडतात. त्यामुळेच की काय यांचे तालुक्यातील येणारी बनावट दारू व खेडेगावात पाडली जाणारी हातभट्टीची दारू बनवणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी वेळ मिळत नाही. दारू पिल्याने मद्यपिंचे केवळ संसार उघड्यावर येत नाही तर रासायनिक प्रक्रिया केलेली विषारी दारू पिऊन जीव धोक्यात येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग किनवटचे कार्यालय फक्त शोभेची वस्तू बनली असून येथील निरीक्षक व दुय्यम निरीक्षक आणि त्यांचे अधिनस्त कर्मचारी उंटावर बसून शेळ्या राखण्याचे काम करत आहे, या प्रकरणी अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांनी प्रभावी कारवाई करावी अशी मागणी होत आहे. किनवटचे दुय्यम निरीक्षक यांना संपर्क साधून त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी आम्ही कारवाई करत आहोत, इतके बोलून अतिशय नाराजीने संपर्क समाप्त केला. किनवट/माहूर तालूका हा अवैध धंदे व्यवसायाने दोन्ही तालुके आता बिहारच्या दिशेने जात आहे? असा प्रश्न सर्वे सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.