हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचा रविवारी सकाळी थाटात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जल्लोषात हा कार्यक्रम पार पडला.


शुभारंभ कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आमदार जवळगांवकर म्हणाले की, “राजकारणात खोटं बोलून मत मागता येत नाही. गेल्या वर्षभरात विरोधकांनी काहीही काम केले नाही, आणि आता मतदानाच्या तोंडावर खोटे आरोप व दिशाभूल सुरू केली आहे. काम करताना कमी-जास्त होऊ शकतं, पण मी नेहमी पारदर्शकतेने व इमाने-इतबारे काम करत जनतेची सेवा केली आहे.” मागील काळात आमच्या पदाधिकारी यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनता पुन्हा काँग्रेसच्या हाथी सत्ता देईल.



ते पुढे म्हणाले, “ स्व:तला उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी जनतेकडे जाऊन मत मागावं. आम्ही मागील काळात हिमायतनगर शहरात विविध विकासकामे राबविली. त्या कामांचा विचार करून यावेळीही काँग्रेसला आपला विश्वास देऊन मतदान करावं,” असे आवाहन त्यांनी हिमायतनगर येथील जनतेला केले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक उपस्थित होते. प्रचार कार्यालयाच्या शुभारंभानंतर काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकूणच ही निवडणूक प्रमुख पक्षांच्या नेत्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.


जनतेने काँग्रेसच्या हातात सत्ता दिली तर उर्वरित विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्नाची पराकष्टा करिन असे अभिवचन माजी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी देत आगमी काळात काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जनतेसमोर घेऊन मतदान रुपी अधीर्वाद मागणार असल्याचे त्यांनी माध्यमाशी बोलतांना जाहिर केले.


