नांदेड| राष्ट्र महापुरुष वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याखालील चबुतरा व परिसरातील संपूर्ण सुशोभीकरणासह पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी मजबूत सीडीची कायमस्वरुपी व्यवस्था करून शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाच्या धर्तीवर या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालावी, अशी मागणी पुतळा उपसमितीचे अध्यक्ष माधवसिंह चरणसिंह परमार यांच्या नेतृत्वाखालील श्री क्षत्रिय समाज सचिव बिरजुसिंह गहेरवार,कोषाध्यक्ष बद्रिसिंह काथी, सहसचिव सुरेशसिंह परमार, अजिवन सदस्य मनोजसिंह ठाकुर, समाज सेवक तारूसिंह कौशिक, मोहनसिंह कच्छवा, बरजोरसिंह गहेरवार आदींच्य शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.
राष्ट्र महापुरुष शुरवीर महाराणा प्रतापसिंसहजी भव्य प्रतिमा (पुतळा) उपसमितीच्यावतीने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले की, सदैव राष्ट्रभक्ती आणि स्वाभीमानपूर्वक जीवन जगण्याची प्रेरणा देणारे शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांचा ऐतिहासिक पुतळा उभारण्याची स्थानिक क्षत्रिय समाजाची मागणी 22 फेब्रुवारी 2014 रोजी पूर्ण करून प्रशासनाने समाजाच्या भावनांचा आदर केला आहे.परंतु अल्पावधीतच या स्मारकाला तडा गेल्याने 13.5 फूट उंचीच्या मुर्तीतून पावसाळ्यात पाण्याची गळती होत असल्याची बाब समाजाच्यावतीने नांदेड मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत मनपा प्रशासनाने शूरवीर महाराणा प्रतापसिंह पुतळ्या खालील चबुतर्याच्या सुशोभिकरणाचे काम नुकतेच हाती घेतले आहे.
ही बाब समाजासाठी आनंदाची व समाधानाची आहे. परंतु या सुशोभिकरणासोबतच पुतळ्याच्या पाठीमागे उभारण्यात आलेली दगडी गढकिल्ल्याची प्रतिकृती सुद्धा बदलून त्या भागाचेही सुशोभिकरण करण्यची आवश्यकता आहे.विशेष म्हणजे चबुतर्यावर कोणालाही थांबण्यासाठी जागा नाही.शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसरातील चबुतर्याखाली सुंदर असे बॅरीकेट लावून समाजप्रेमींसाठी मानवंदना दालन उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर वीर महाराणा प्रतासिंह यांच्या पुतळ्याभोवती सुद्धा सर्व राष्ट्रीय प्रेमींना मानवंदना देता यावी, यासाठी सुंदर बॅरीकेट तयार करण्यात यावे. शिवाय पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात तयार करण्यात आलेली हॅड्रोलीक लिफ्ट काही वर्षातच कायमस्वरुपी बंद पडली असल्याने जयंती व पुण्यतिथी सोहळादिनी वीर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणे समाजबांधवांसाठी अत्यंत कठीण बनले आहे.
याकडे मनपा प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. परिणामी मनपा प्रशासनाविरुद्ध समाजबांधवांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या ठिकाणी कायमस्वरुपी कुशल वास्तुकला रचनाकार यांच्यामार्फत डिझाईन तयार करून संपूर्ण पुतळा परिसर व चबुतर्याला नवीन स्वरुप देवून या ऐतिहासिक स्मारकाच्या पर्यायाने महानगराच्या सौंदर्यात भर घालावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत मनपा आयुक्तांनाही देवून शिष्टमंडळाच्यावतीने त्यांना वीर महाराणा प्रतापसिंह यांची भव्य प्रतिमा, शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.