नांदेड। सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली माहूर तालुक्यातील मौजे वझरा (शे. फ.) येथे प्लॉट्स पाडून देण्याची मागणी मागील तीन वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. गावखारीची जमीन श्री दत्त शिखर संस्थानाची असल्यामुळे तेथे मागील पन्नास वर्षात प्लॉट्स पडले नाहीत. किंबहुना जागा अपुरी पडत असल्यामुळे अनेक ग्रामस्थ गांव सोडून बाहेरगावी कायमचे गेले आहेत.


वझरा हे गांव पेसा क्षेत्रात येत असून पेसा क्षेत्रातील ग्राम सभेच्या ठरवास खुप महत्व असते.दि.१२ डिसेंबर २०२३ रोजी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव क्रमांक ३ पारीत करण्यात आला.सन २०२३ मध्ये अर्जदारांनी बेमुदत साखळी उपोषण वझरा येथे सुरु केले होते. तेव्हा किनवट – माहूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भीमराव रामजी केराम यांनी प्रत्यक्षात उपोषण स्थळी उपस्थित होऊन श्री दत्त शिखर संस्थानच्या विश्वसतांना फोन वरून बोलून घर बांधण्यासाठी जमीन देण्याची विनंती केली होती.तेव्हा विश्वस्त आणि सचिवानी सकारात्मक अनुकूलता दाखविली होती.



वझरा येथे साठवण तलाव मंजूर झाले तेव्हा असाच जमिनीचा पेच निर्माण झाला होता. आणि महंत महाराजांनी होकार दिला, मोबदला संस्थानास मिळाला आणि एक किलोमीटर पाळूचे तळे तेथे बांधण्यात आले. त्याच पद्धतीने जमीन अधिग्रहण केल्यास मोबदला संस्थानास मिळेल आणि पन्नास वर्षांपासून रखडलेला गावठाणचा प्रश्न निकाली निघेल.



ग्रामपंचायतने पारित केलेल्या ठरवाप्रमाणे श्रीमती शांताबाई रेश्माजी जगदाळे यांच्या घरा समोरील कै. गोविंदराव पाटील माध्यमिक शाळेपर्यंतची जमीन अधिग्रहण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेच्या तहसीलदार यांच्या स्वाक्षरीने माहूर तहसीलदार आणि पं.स.चे गटविकास अधिकारी यांना दि.१२ जून रोजी लेखी स्वरूपात देण्यात आले असून कार्यवाही करण्याचे सूचित केले आहे.

तशी प्रत उप जिल्हाधिकारी (सामान्य) जिल्हाधिकारी कार्यालय (देवस्थान जमीन) आणि मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड यांना देण्यात आली आहे. पहिल्या टप्यातील ६० पात्र अर्जदारांची यादी देखील जिल्हाधिकारी यांनी माहूर तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना पाठविली आहे. राहिलेल्या अर्जदारांची तपासणी सुरु आहे. सीटू कामगार संघटनेच्या आंदोलनास मोठे यश आले असून संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड आणि सरचिटणीस कॉ.उज्वला पडलवार यांचे ग्रामस्थां मधून कौतुक होत आहे.


