नांदेड l नांदेड शहरातील इतवारा बाजार परिसरात पाणी व वीज या मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांच्या नाराजीचा कडेलोट झाला आहे. नळाला पाणीपुरवठा सुरू होताच महावितरणकडून वीजपुरवठा अचानक खंडित केला जात असल्याने पाणी उचलण्यासाठी पंपही सुरू करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


येतं ते पाणी दूषित, आरोग्यास धोका नळातून येणारे पाणी काळसर व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. यामुळे पोटाचे विकार, त्वचारोग व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.


तातडीने दखल घ्यावी — मागणी नागरिकांच्या या गंभीर प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, तसेच शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा नियमित सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.




