किनवट,परमेश्वर पेशवे| प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर महिलेच्या सरळ बँक खात्यात जमा करण्यात येणारी आर्थिक मदत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जमाच झाली नाही. आजही किनवट तालुक्यातील साडेचारशेच्या आसपास लाभार्थी महिला या मदतीपासून वंचितच आहेत.


गर्भधारणा झाल्यानंतर देण्यात येणारी ही आर्थिक मदत अनेक महिलांची प्रसूती झाली, बाळ तीन ते चार महिन्यांचे झाले तरी बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किनवटच्या टीएचओ कार्यालयात खेटे मारून त्रस्त झाल्या आहेत. महिलांसाठी अनेक योजना राबविणाऱ्या केंद्र सरकारला याचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. गर्भवती महिला आणि नवजात शिशुंना सदृढ आरोग्य सेवा मिळावी त्या अंतर्गत सरकार गर्भवती महिला आणि गरीब श्रमिकांना आरोग्य सेवा मिळावी व निधीचा उपयोग आरोग्य सेवेसाठी करता यावा यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली.

सरकारच्या वतीने भारतात अनेक जनकल्याणकारी योजना राबविण्यात येतात, त्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा समावेश आहे. गर्भवती महिलांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ प्रसूतीनंतर मिळत असेल तर ही योजना गर्भवती महिला व शिशूच्या काय कामाची, या योजनेची आर्थिक मदत बँक खात्यात जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात ‘साहेब, मदत कधी जमा होणार म्हणून खेटे मारीत असल्याचे चित्र आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. के. पी. गायकवाड यांना विचारले असता फॉर्म भरलेल्या लाभार्थ्यांना आठ ते नऊ महिन्यांपासून आर्थिक मदत जमा झाली नसल्याच्या दुजोरा दिला आहे.


१८२ लाभार्थ्यांच्या खात्यात मदत
२०२३-२४ या वर्षात ५७५ लाभार्थी असताना १८२ लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा झाली आहे. त्यात ११३ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे. २०२४-२५ या वर्षात २७१ पैकी २१८ लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा झाली आहे. त्यात पहिल्या मुलासाठी पहिला हप्ता २१८ लाभार्थ्यांच्या खात्यात अशी एकूण ३०२ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रथम आर्थिक मदत जमा झाली आहे.

४५६ महिलांच्या खात्यात मदत नाही
प्राप्त माहितीनुसार ४५६ लाभार्थी महिलांच्या खात्यात आर्थिक मदत अजूनही जमा झालेली नाही. ६८ लाभार्थ्यांच्या खात्यात दुसरा हप्त्याची आर्थिक मदत जमा झाली आहे. पहिल्या मुलासाठी आर्थिक मदत जमा केली जाते. दुसरा हप्ता मुलीसाठी दिला जातो. ज्या गर्भवती महिलांसाठी ही योजना आहे त्यातील अनेक महिलांची प्रसूती झाली, तीन ते चार महिन्यांचे बाळही झाले, तरी रक्कम मिळालेली नाही.

