नांदेड | नांदेड शहरातील अवैध दारू विक्रीविरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्याने मोठी आणि निर्णायक कारवाई करत दोन जणांवर गुन्हा दाखल करून ₹4 लाख 10 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. दि. 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.45 वाजता भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला.

नांदेड पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या छाप्यात 20,160 रुपये किमतीची देशी दारू ₹3,90,000 किंमतीचे चारचाकी वाहन
असा एकूण ₹4,10,160/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी नितीन किशन गावकार (वय 32, व्यवसाय मजुरी), प्रशांत उर्फ ज्ञानेश्वर गावकार (वय 30, व्यवसाय मजुरी) रा. सुभाष नगर, नांदेड यांच्याविरोधात गु.र.नं. 43/2026 कलम 65 (ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नांदेड शहरात धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अवैध दारू विक्री, वाहतूक किंवा साठा करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई यशस्वी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.


