नांदेड। वसंतनगर नांदेड येथील नामांकित अशा राजर्षी शाहू विद्यालयात मराठवाडा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांची 12 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती साजरी कराण्यात आली.
याप्रसंगी कै. डॉ. जे.जी. वाडेकर यांच्या स्नुषा व प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सौ. गायत्री वाडेकर यांच्या वतीने शाळेत गरीब, गरजू व होतकरू अशा 50 विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, स्कूल बॅग, वह्या इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी, आठवी व एमएनएमएस ह्यामधील खुल्या व राखीव प्रवर्गातील सहा विद्यार्थ्यांना तीस हजार रूपयांची शिष्यवृत्तीची घोषणा केली. डॉ. वाडेकर कुटुंबियांनी गेल्या 11 वर्षांपासून या शिष्यवृत्तीमध्ये खंड पडू दिला नाही. यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक प्राचार्य डॉ. गोपाळराव कदम, चंद्रशेखर सोनवणे, डॉ. पी.डी. जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रास्ताविकात उपमुख्याध्यापक पी.एम. सावंत यांनी डॉ. वाडेकर यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
या नेटक्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी.एम. हंगरगे हे होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख मांडला. याच कार्यक्रमात विविध परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एस.एल. टापरे यांनी केले, तर आभार डॉ. एम.एम. गाडेकर यांनी मानले.