नांदेड। कलांगण प्रतिष्ठान व दैनिक प्रजावाणीच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी आषाढी एकादशी निमित्त कुसुम सभागृहात आषाढी महोत्सव संपन्न झाला. यानिमित्त सादर करण्यात आलेल्या गजर हरिनामाचा या पांडुरंगाच्या भक्तीगीतांच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व रसिक जन भक्तीरसात न्हाऊन निघाले! सायंकाळी ६.३० वाजता कुसुम सभागृह खचाखच भरले होते.
या मैफिलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांनी पांडुरंगाच्या मूर्तीपूजेसह दीप प्रज्वलन करून केले. प्रमुख अतिथी श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक व श्री महेश कुमार डोईफोडे, आयुक्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका दोघेही सपत्नीक उपस्थित होते. तर विशेष निमंत्रितांमध्ये डीसीबी बँकेच्या मुख्य व्यवस्थापक श्रीमती प्रीती जमदाडे, प्रसिद्ध उद्योजक श्री माधवराव पटणे, उद्योजक श्री अनिल शेटकार, यशवंत नगरच्या राम मंदिराचे अध्यक्ष श्री रमेश मिरजकर, आणि समाज कल्याण अधिकारी व गझलकार श्री बापू दासरी यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी, कलांगणच्या महिला सदस्यांनी येणाऱ्या सर्व रसिकांचे गंध, बुक्का लावून प्रवेशद्वारावर स्वागत केले.
यावेळी, कलांगणच्या सदस्यांनी पारंपारिक महाराष्ट्र वेश परिधान केलेला असल्यामुळे उत्साहाचे वातावरण द्विगुणीत झाले होते. महाराष्ट्राचे भगवे ध्वज व काढलेली रांगोळी हे रसिकांच्या ध्यानाकर्षणाचे कारण ठरले. विठ्ठलाला अतिप्रिय असलेले तुळशीचे रोप, जे पर्यावरण रक्षक वृक्षरोपणाचा संदेश देते ते जागृतीचे प्रतीक म्हणून सर्व मान्यवरांना सत्काराप्रित्यर्थ देण्यात आले.यावेळी, मान्यवरांना लावलेला वारकरी टिळा व टोपी लक्षवेधक ठरले. उद्घाटकीय वक्तव्यातून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आषाढीच्या मंगल शुभेच्छा नांदेडकरांना देऊन आषाढी महोत्सवाचे नेहमी आयोजन केले पाहिजे,ज्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना होते असे उद्गार काढले!
यावेळी कलांगण प्रतिष्ठान या सांस्कृतिक संस्थेचे उद्घाटन देखील करण्यात आले. कलांगण ही संस्था नांदेड जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळ गतिशील ठेवण्यासाठी निर्माण झाली आहे व या संस्थेस वार्षिक सदस्य झाल्यानंतर वर्षातून दर्जेदार चांगले चार कार्यक्रम सदस्यांना मिळतील व त्याशिवाय नांदेड मधील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे असे निवेदक व संस्थेचे सचिव एडवोकेट गजानन पिंपरखेडे यांनी सांगितले तर या संस्थेचे सदस्यत्व जास्तीत जास्त रसिकांनी स्वीकारावे असे आवाहन सुप्रसिद्ध गायक श्री त्यागराज खाडिलकर यांनी केले! उद्घाटकीय कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कलांगणचे अध्यक्ष श्री रमेश मेगदे यांनी केले. यानंतर गजर हरिनामाचा या कार्यक्रमाला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली.
राम कृष्ण हरी च्या नाम घोषात साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याचा भास रसिकांना होत होता. आपल्या पहाडी आवाजात पंडित त्यागराज खाडीलकर यांनी विठूचा गजर हरिनामाचा हे गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर, सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाची उपविजेती संज्योती जगदाळे हिने आपल्या आवाजाने सर्वांना मोहित केले. स्थानिक कलावंत असावरी जोशी व रागिणी जोशी यांनी रसिकांची मने जिंकली. तर ,स्वरच्छंद प्रतिष्ठानचे विद्यार्थी भाग्यश्री टोमके, कंधारकर व देशपांडे यांनी कोरसची बाजू सांभाळली.
या कार्यक्रमाचे निरूपण वजा बहारदार सूत्रसंचालन एडवोकेट गजानन पिंपरखेडे व डॉक्टर वैशाली गोस्वामी यांनी केले तर श्री प्रमोद देशपांडे, पंकज शिरभाते, राजेश भावसार, स्वप्नील धुळे, विश्वेश्वर जोशी, शेख नईम, व इंगळे यांनी सुरेख साथ संगत केली. या कार्यक्रमाचा आस्वाद माजी मंत्री श्री डीपी सावंत, पत्रकार श्री विजय जोशी, सहा.आयुक्त समाज कल्याण, श्री शिवानंद मिनगिरे व असंख्य प्रतिष्ठित मंडळींनी घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कलांगणचे अध्यक्ष रमेश मेगदे, कार्याध्यक्ष राम तुप्तेवार, उपाध्यक्ष नंदकुमार दुधेवार, कोषाध्यक्ष रमाकांत गंदेवार, प्रणव मनुरवार,लक्ष्मीकांत बंडेवार, विजय डुमणे, प्रभाकर उदगीरे, स. जगजीवन सिंग रिसालदार, संतोष पाळेकर, सुभाष बंग, सचिन कोटलवार, गजानन रेखावार, एडवोकेट उर्मिला हतडे, सौ प्राजक्ता वाकोडकर, अंजली देशमुख, मेघा जोशी सांगवीकर, वंदना हुरणे, मनीषा कामठेकर, शितल कांजाळकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.