नांदेड | राज्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान नांदेड जिल्ह्यात पूर्ण क्षमतेने आणि जोमाने सुरू असून, या मोहिमेच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांनी नांदेड जिल्ह्याचा विशेष दौरा केला.
दुर्गम व आदिवासी भागात सुरू असलेल्या तपासणी, सर्वेक्षण आणि जनजागृती कामाची त्यांनी मैदानात उतरून पाहणी केली व आरोग्य यंत्रणेला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


किनवट–माहूर–भोकर ते नांदेडपर्यंत क्षेत्रीय दौरा झाला – या दौऱ्यात डॉ. कानगुले यांनी किनवट, माहूर, भोकर व नांदेड तालुक्यांतील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांना भेटी देऊन अभियानाची अंमलबजावणी तपासली. त्यांच्या समवेत जिल्हा आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तपासणी, सर्वेक्षण आणि जनजागृतीवर भर सिकलसेल स्क्रिनिंग: आरोग्य केंद्रांवर सुरू असलेल्या तपासणी प्रक्रियेची सखोल पाहणी करताना “एकही नागरिक तपासणीपासून वंचित राहू नये” अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. घराघरांत सर्वेक्षण: दुर्गम भागातील कुटुंबांपर्यंत पोहोचून तपासणी पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले.


जनजागृती मोहीम: सिकलसेल ॲनिमियाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रभावी संवाद, समुपदेशन व स्थानिक भाषेत माहिती देण्याचे मार्गदर्शन केले. डॉ. कानगुले यांनी ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील औषध साठा, प्रयोगशाळा सुविधा, उपचारातील सातत्य यांचा आढावा घेत सिकलसेल बाधित रुग्णांना नियमित व दर्जेदार उपचार मिळतील याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या.


“वेळीच निदान हाच प्रभावी उपाय” – डॉ. कानगुले
मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या विशेष अभियानात जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. सिकलसेल ॲनिमिया रोखण्यासाठी वेळीच निदान आणि सातत्यपूर्ण उपचार ही काळाची गरज आहे.”
जिल्हा आरोग्य विभाग सज्ज
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी अभियानाच्या तयारीची माहिती देत नांदेड जिल्हा सिकलसेलमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग पूर्णतः कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अरुणोदय अभियान केवळ तपासणीपुरते मर्यादित न राहता, आजाराविरोधातील लढ्यात जनजागृती, उपचार व प्रतिबंधाचा भक्कम पाया घालत असल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात दिसून येत आहे.

