नांदेड | पीपल्स हायस्कूल, नांदेड येथील १९७७ सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे आठवे स्नेहमिलन सोहळा शनिवार दि. १७ व रविवार दि. १८ जानेवारी २०२६ रोजी टिकोना फार्म, मुळशी (पुणे) येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल ४९ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी या स्नेहमिलनात जुन्या आठवणींना उजाळा देत मैत्रीचे धागे अधिक घट्ट केले.


या स्नेहमिलनास ३५ विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. यापूर्वी या बॅचचे तीन स्नेहमिलन नांदेड, तीन पुणे, एक नाशिक व एक छत्रपती संभाजीनगर येथे पार पडले असून, यंदाचे हे आठवे स्नेहमिलन विशेष संस्मरणीय ठरले.

या कार्यक्रमात अनिल महामुनी, अरुणा महामुनी, श्रीकांत अकोलकर, शशिकांत गोहेल, अनिल अमृतवार, गंगामणी अमृतवार, व्यंकटेश कवटेकवार, बालाजी गिरी, अविनाश जोशी, प्रमोद व ज्योत्सना डुब्बेवार, श्रीकांत व सुनीता मांगुळकर, चंद्रकांत व सुजाता पांडे, शिरीष दडके, सुरेश पवार, विलास देशमुख, विजय वाघ, राजू बच्चेवार, अमोल कुलकर्णी, प्रशांत खरवडकर, अनिल शर्मा, दुर्गादास कुलकर्णी, कल्पना व्याहालकर, प्रमोदिनी दिग्गीकर, छाया रोळे, शिवाजी बर्वे, शोभा देशपांडे, स्मिता व संजय बोकील, स्वाती व अनिल पटवर्धन, संजीवनी कापसिकर, विनिता आरोळे आदी मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.


१९७७ साली दहावी पूर्ण झाल्यानंतर अनेक मित्र-मैत्रिणींची पहिल्यांदाच भेट याच स्नेहमिलनात झाली. या भेटीत शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे स्मरण, तसेच आपापल्या क्षेत्रात केलेल्या कार्याविषयी सखोल चर्चा व विचारांची देवाण-घेवाण झाली. दरवर्षी अशा स्नेहमिलनातून आयुष्य समृद्ध व निरोगी राहो, अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.

या स्नेहमिलनात केवळ आठवणींचा ठेवा नव्हे तर सांस्कृतिक व खेळांच्या उपक्रमांचीही रेलचेल होती. नृत्य, गायन, भवरे, विटीदांडू, लगोरी, पतंग उडवणे, क्रिकेट, लंगडी यांसारखे पारंपरिक खेळ खेळण्यात आले. “शाळेतील बालपण पुन्हा एकदा जगल्याचा आनंद मिळाला,” असे अनिल अमृतवार यांनी सांगितले. मैत्री, आठवणी आणि निरोगी आयुष्याचा संदेश देणारे हे स्नेहमिलन शैक्षणिक संस्कारांची जिवंत साक्ष ठरले.

