निजामाबाद, एस नविनकुमार| जिल्ह्यातील नंदिपेठ, डोणकेश्वर मंडल अंतर्गत येणाऱ्या नडकुडा येथे दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत ग्रामदैवत श्री श्री श्री अग्निमल्लन्ना यांच्या जत्रा महोत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी पारंपरिक अग्निकळश शोभायात्रेने या पाच दिवसीय धार्मिक सोहळ्याला भव्य व भक्तीमय सुरुवात झाली.


हलगीच्या तालावर, डोक्यावर प्रज्वलित अग्निकळश घेऊन हजारो महिला भाविकांनी सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. “श्रद्धा, संयम व समर्पण” यांचा प्रत्यय देणारी ही शोभायात्रा ग्रामसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारी ठरली.


यात्रेनिमित्त पशुधनाची समृद्धी, भरघोस पर्जन्यवृष्टी, शेतीचा विकास व ग्रामकल्याण यासाठी भाविकांनी श्री अग्निमल्लन्ना देवाकडे सामूहिक प्रार्थना केली. शोभायात्रेत सहभागी भाविकांनी मंदिराभोवती पाच प्रदक्षिणा घालून दर्शन घेतले व देवाचे आशीर्वाद प्राप्त केले.



दरम्यान, श्री श्री श्री अग्निमल्लन्ना गुडी (मंदिर) पुनर्रचना व नूतनीकरणासाठी देणगी दिलेल्या सर्व ग्रामस्थ व भाविकांचे आयोजक समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. हा धार्मिक सोहळा श्री श्री श्री अग्निमल्लन्ना आलयम कमिटी व ग्राम प्रजाजनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने या जत्रा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


