Homeकृषीपाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल!

पाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल!

तुटपुंज्या मदतीच्या निषेधार्थ सोमवारी हिमायतनगर तहसील कार्यालयावर ‘भीक मागो’ आंदोलन; हेक्टरी एक लाखांच्या मदतीसह पीकविम्यासाठी आक्रमक पवित्रा

हिमायतनगर, अनिल मादसवार| शेतकऱ्यांच्या शेतात पीक उभे राहिले नाही, हातात पैसा नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि समोर दिवाळीचा सण! अशा परिस्थितीत अवघ्या पाच हजार रुपयांच्या मदतीवर शेतकऱ्यांनी संसार कसा चालवायचा? हा सवाल उपस्थित करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शासनाच्या मदतीच्या घोषणेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मदतीचा निषेध करण्यासाठी सोमवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष रामदास गणपतराव शिरफुले यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.

मदतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची बोळवण? शेतीसाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च करायचे; निसर्गाने साथ सोडली की हातात आलेले पीकही वाया जायचे. त्यानंतर कर्जाचे हप्ते, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि जनावरांच्या चाऱ्याची चिंता शेतकऱ्यांच्या मागे लागते. अशा संकटात पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर कितपत उपाय ठरणार, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी तुटपुंजी मदत जाहीर करून त्यांच्या प्रश्नांची बोळवण केली जात असल्याची टीका संघटनेने केली आहे. शेतकऱ्यांना केवळ घोषणांची नव्हे, तर प्रत्यक्ष खात्यात जमा होणाऱ्या भरीव आर्थिक मदतीची गरज असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे.

IMG 20261016 WA0045 पाच हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार? क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा संतप्त सवाल!

हेक्टरी एक लाख रुपये द्या; प्रलंबित पीकविमा तत्काळ जमा करा! क्रांतिकारी शेतकरी संघटनेने शासनासमोर चार प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, सन २०२४ आणि २०२५ मधील प्रलंबित पीकविमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे आणि दुष्काळी भागात मायक्रोफायनान्स संस्थांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान झाले, कर्जाचा बोजा वाढला; मग दिलासा देण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित करत  पीकविमा आणि आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

‘भीक मागो’ आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधणार – शासनाने जाहीर केलेल्या मदतीचा निषेध नोंदवण्यासाठी सोमवारी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामदास गणपतराव शिरफुले यांनी १५ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलनाची माहिती दिली आहे.

आता प्रश्न केवळ पाच हजार रुपयांचा नाही; प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या जगण्याचा, त्यांच्या कष्टाच्या मोबदल्याचा आणि शेती टिकवण्याचा! शासन या आक्रोशाची दखल घेऊन ठोस निर्णय घेणार की शेतकऱ्यांना पुन्हा आश्वासनांवरच समाधान मानावे लागणार, याकडे हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments