नांदेड, अनिल मादसवार| नांदेड शहरातील श्रीनगर परिसरात रोहित बार आणि मोगडपल्ली मेडिकल सेंटरच्या मधून कोचिंग क्लासेसकडे जाणाऱ्या गल्लीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्याने व्यापारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात दुर्गंधी पसरत असून, व्यावसायिकांना व्यवसाय करणेही कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.


या गल्लीमधून दररोज अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी कोचिंग क्लासेससाठी ये-जा करतात. मात्र, रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यातून त्यांना मार्ग काढावा लागत आहे. यामुळे अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिकांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.


तात्पुरती स्वच्छता, पुन्हा दुर्गंधी!
या समस्येबाबत परिसरातील व्यापारी आणि नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. महापालिकेचे स्वच्छता पथक किंवा वाहन येऊन काही प्रमाणात स्वच्छता करते; मात्र दोन-चार दिवसांत पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे केवळ तात्पुरती स्वच्छता न करता ड्रेनेजच्या समस्येचे मूळ कारण शोधून कायमस्वरूपी उपाय करावा, अशी मागणी होत आहे.



प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे!
परिसरातील व्यापारी पवन लोहगावकर यांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून या समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाय झालेला नाही. घाण पाण्यामुळे दुर्गंधी पसरत असून, व्यवसायावरही परिणाम होत आहे.
महानगरपालिका प्रशासन, संबंधित नगरसेवक, महापौर आणि उपमहापौर यांनी या समस्येची तातडीने दखल घेऊन ड्रेनेजची दुरुस्ती करावी आणि श्रीनगर परिसरातील व्यापारी, विद्यार्थी व नागरिकांना या त्रासातून मुक्त करावे, अशी मागणी व्यापारी पवन लोहगावकर यांनी केली आहे. — पवन लोहगावकर, व्यापारी, श्रीनगर, नांदेड

