नांदेड, प्रतिनिधी| शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीक परिस्थिती जाणून घेण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मोटारसायकलवरून शेतांमध्ये जाऊन पाहणी केली. ताकबीड येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी करण्यासाठी त्यांनी परिसरातील विविध शेतगटांना भेट देत शेतीची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली.


जिल्हाधिकाऱ्यांनी मोटारसायकलवरून मार्गक्रमण करताना शेतांमधील सोयाबीनसह विविध पिकांची वाढ, पावसाचा झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनावर होणारा परिणाम याची पाहणी केली. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता शेताच्या बांधावर जाऊन परिस्थिती समजून घेण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रयत्न विशेष ठरला.


ताकबीड येथे निवडलेल्या पीक कापणी प्रयोगाची प्रक्रियाही त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. यावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून पीक परिस्थिती, प्रयोगाची पद्धत आणि नोंदविण्यात येणाऱ्या उत्पादनासंदर्भातील आवश्यक माहिती त्यांनी जाणून घेतली.



पीक कापणी प्रयोग अचूक होण्यावर भर – यंदा कमी व अनियमित पावसामुळे अनेक भागांत पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोग नियमाप्रमाणे, पारदर्शक आणि अचूक पद्धतीने होणे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केल्याने क्षेत्रीय यंत्रणेलाही पीक कापणी प्रयोग गांभीर्याने व निर्धारित कार्यपद्धतीनुसार करण्याचा स्पष्ट संदेश मिळाला.
शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेणाऱ्या जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या या क्षेत्रभेटीची परिसरात चर्चा होत आहे.

