नांदेड, प्रतिनिधी| शासनाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद’ उपक्रमांतर्गत नांदेड शहरातील जुना मोंढा परिसरातील मागील ५५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्री सूर्य गणेश मंडळ येथे लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


या कार्यक्रमात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मिळणारे आर्थिक सहाय्य तसेच युवकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभा’ची माहिती नागरिकांना देण्यात आली.


गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदतीची माहिती
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे समाजसेवा अधीक्षक गजानन वानखेडे यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध होणाऱ्या आर्थिक मदतीबाबत मार्गदर्शन केले.



योजनेची पात्रता, अर्ज करण्याची पद्धत, आवश्यक कागदपत्रे, अर्ज सादर करण्याचे ठिकाण तसेच अर्जावरील कार्यवाहीची माहिती कशी मिळवावी, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व धर्मादाय रुग्णालय कक्ष कार्यरत असून, १ मे २०२५ पासून जिल्हास्तरावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र रुग्णांना आर्थिक मदतीसाठी मुंबईला जाण्याची आवश्यकता नसून नांदेडमधूनच अर्ज करता येतो.
युवकांसाठी रोजगाराची मोठी संधी
युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड जिल्ह्यातील २५ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय ‘रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात स्थानिक तसेच इतर ठिकाणच्या नामांकित आस्थापना व उद्योजक सहभागी होणार आहेत. १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, डिप्लोमा (सर्व ट्रेड) तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या नांदेड जिल्ह्यातील युवक-युवतींनी या रोजगार महाकुंभाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी प्रवीण रुद्रकंठवार यांनी केले.
लोकसंवादाच्या माध्यमातून शासनाच्या योजना, सुविधा आणि विविध उपक्रमांची माहिती नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उपलब्ध योजनांची माहिती जाणून घ्यावी आणि पात्रतेनुसार शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय समन्वयक संभाजी लोंढे, कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विरेंद्र चव्हाण, श्री सूर्य गणेश मंडळाचे पदाधिकारी लड्डू पुरोहित, आकाश ठाकूर, श्रीकांत ठाकूर, दीपक ठाकूर, अशोक भागवत, राहुल भागवत, मुकुंद येरमवार, दैनिक प्रजावाणीचे गोवर्धन बियाणी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

