हिमायतनगर, अनिल मादसवार | एकीकडे अल्प पावसामुळे शेतकरी चिंतेत असताना आता जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. हिमायतनगर तालुक्यातील दरेसरसम परिसरातील उमरहिरा तांडा येथील शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे रोहीने नुकसान केल्याची घटना समोर आली आहे.


उमरहिरा तांडा येथील सुभाष बाळाराम राठोड व राजू बाळाराम राठोड यांच्या जंगलालगत असलेल्या शेतात रोहीने घुसून कापूस पिकाची नासाडी केली. या घटनेत अंदाजे दोन बॅग कापसाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


अल्प पावसामुळे आधीच पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच वन्यप्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. रोही तसेच हरणांच्या कळपांकडून पिकांचे नुकसान होण्याचे प्रकार जंगलालगतच्या शेतांमध्ये वाढत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.



या घटनेची माहिती संबंधित वनविभागाला देण्यात आली असून, नुकसानीचा पंचनामा करून शासन नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सुभाष राठोड व राजू राठोड यांनी केली आहे. वनविभागाने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


