नांदेड| भोकर-बारड राष्ट्रीय महामार्गावरील सीताखंडी घाटात गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या दुर्घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच जखमींना योग्य उपचार आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.


या अपघातातील जीवितहानीबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या कठीण प्रसंगी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत त्यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.



