हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील आठ-दहा गावांतील नागरिकांच्या वीजपुरवठा व लाईनसंदर्भातील विविध तक्रारी घेऊन शेतकरी व नागरिक बुधवारी महावितरण कार्यालयात दाखल झाले. शेतकऱ्यांच्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने तोडगा काढण्याच्या मागणीसाठी शेतकरी पुत्र वामनराव पाटील वडगांवकर, प्रल्हाद पाटील टेंभूर्णीकर यांच्यासह अनेक शेतकरी महावितरण कार्यालयात गेले.
मात्र बुधवार हा आठवडी बाजाराचा दिवस असतानाही संबंधित उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील हे कार्यालयात उपस्थित नसल्याने नागरिकांची त्यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून अनोख्या पद्धतीने ‘सत्कार’ करत निषेध नोंदविला.
पिकांचे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता वीज समस्यांचा फटका यंदा पावसाच्या खंडामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला आहे. तूर, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, हळद यांसह विविध पिकांचे नुकसान होत असताना महावितरणच्या वीजपुरवठ्यातील समस्या, विद्युत लाईनच्या तक्रारी आणि दुरुस्तीच्या कामांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढत आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी अधिकारी कार्यालयात उपलब्ध नसतील, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे?, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. महावितरण विभागाने वीजपुरवठा व लाईनसंबंधी तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक दुरुस्तीची कामे करावीत. शेतकरी आधीच नैसर्गिक संकटाशी झुंज देत असताना महावितरणच्या कारभारामुळे त्यांची आणखी कोंडी होऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, महावितरणने आपल्या कारभारात तातडीने सुधारणा करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण केले नाही, तर शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, शेतकऱ्यांच्या तक्रार संदर्भात अधिकारी कर्मचाऱ्याकडून होणारे फोन उचलण्याचे प्रकार तातडीने बंद करून कारभार सुधारणा व्हावी अन्यथा शेतकरी पुत्रच्या वर्षाच्या सामना करावा लागेल असा इशारा यावेळी देण्यात आला.

