लातूर| नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या निर्देशानुसार त्यांच्या पथकाने लातूर जिल्ह्यात मटका व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली. २८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत ३१ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, ५७ हजार २०० रुपये रोख, २५ मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा एकूण ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



भादा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गुळखेडा येथे बालाजी सुरवसे याच्या पत्र्याच्या शेडमध्ये तसेच खंडू भोसले याच्या हॉटेलमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला. या कारवाईत १७ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३४ हजार ३२० रुपये रोख, १५ मोबाईल आणि दोन मोटारसायकली, असा एकूण ३ लाख ६० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १८०/२०२६, महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोहेकॉ शिरीष पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.



दरम्यान, पथकाने औसा शहरातील कालन गल्ली येथे अबुझर अतिक शेख यांच्या इमारतीतील मटका बुकीवरही कारवाई केली. या ठिकाणाहून २२ हजार ८८० रुपये रोख आणि ६९ हजार ४०० रुपये किमतीचे १० मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, औसा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ४९८/२०२६, महाराष्ट्र जुगार कायद्यातील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ बालाजी चव्हाण करीत आहेत.

दोन्ही कारवायांमध्ये पथकाने एकूण ३१ जणांविरुद्ध कारवाई करून ५७ हजार २०० रुपये रोख, २५ मोबाईल आणि दोन मोटारसायकली असा ४ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदिप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले.

