नांदेड/धर्माबाद, प्रतिनिधी| येताळा तालुका धर्माबाद येथील कु. मनविता राकेश रेड्डी कोपलोड हिने नवी दिल्ली येथे आयोजित 18 व्या आर्णीस वर्ल्ड चॅम्पियनशिप–2026 स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. तिच्या या यशामुळे येताळा गाव, धर्माबाद तालुका, नायगाव मतदारसंघ आणि नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध देशांतील खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत मनविताने कौशल्य, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर पदकावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.


मनविता ही विधी महाविद्यालयाचे निवृत्त कर्मचारी राज रेड्डी यांची नात असून, लहानपणापासूनच तिने क्रीडा क्षेत्रात सातत्याने मेहनत घेतली आहे. तिच्या चिकाटी, कठोर सराव आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळे तिला जागतिक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकण्याचा मान मिळाला.



या उल्लेखनीय यशाबद्दल सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंदराव मुंडकर यांनी मनविताचे अभिनंदन करत तिची कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलीही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, हे मनविताने सिद्ध केल्याचे त्यांनी नमूद केले.
मनविताच्या या यशाबद्दल येताळा ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही ती भारतासाठी आणखी पदके जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

