नांदेड, प्रतिनिधी | मंजूर विकास आराखड्यातील रस्ता रुंदीकरणातील अडथळे दूर करण्यासाठी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेने सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) इदगाह कमान ते बोंढार बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या धडक कारवाईत अनेक वर्षांपासून असलेली पक्की व कच्ची अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली.


महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे आणि पोलीस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर विकास आराखड्यानुसार इदगाह कमान ते बोंढार बायपास हा ६० फूट रुंदीचा रस्ता विकसित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून रस्त्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे हे काम रखडले होते. काही ठिकाणी नागरिकांनी रस्त्याच्या जागेवर सुमारे ३३ फूटांपर्यंत अतिक्रमण करून घरे, शेड्स आणि दुकानांचे वाढीव बांधकाम केले होते.




सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागणीनंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने या मार्गावरील १० ते १५ घरांवरील पक्की बांधकामे, अनधिकृत शेड्स आणि दुकानांचे वाढीव भाग हटवून रस्त्याची जागा मोकळी केली.
महापालिकेने शहरातील इतर भागांमध्येही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवणार असल्याचे संकेत दिले असून, मंजूर विकास आराखड्यातील रस्ते, सार्वजनिक जागा आणि पायाभूत सुविधांच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

