किनवट, तालुका प्रतिनिधी| किनवट तालुक्यातील कंचली गावाजवळ पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ३२ वर्षीय तरुणाचा शोध गुरुवारीही सुरूच होता. सततचा पाऊस आणि नदीतील वाढलेला प्रवाह यामुळे शोधकार्याला अडथळे येत असून, घटना घडून सुमारे २४ तास उलटल्यानंतरही तरुणाचा शोध लागला नव्हता.


माहितीनुसार, कंचली ग्रामपंचायतीत सेवक म्हणून कार्यरत असलेले राजू रेड्डी दांडेलु (वय ३२) हे बुधवारी सायंकाळी कंचलीहून रेवानाईक तांड्याकडे जात होते. कंचली-आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले.


घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर इस्लापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. शोध पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू असले तरी वाढत्या पाण्याच्या वेगामुळे अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे पांगरपहाड, आंदबोरी, रेवानाईक तांडा आणि अप्पारावपेठ या गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.



या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी कंचली-आंदबोरी मार्गावरील कमी उंचीच्या पुलाऐवजी सुरक्षित व उंच नवीन पूल उभारण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरली आहे. पावसाळ्यात अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे.

