कंधार, प्रतिनिधी | कौटुंबिक वादातून स्वतःच्या आईचा निर्घृण खून करणाऱ्या मुलाला अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माळाकोळी पोलिसांनी केलेला भक्कम तपास, वैज्ञानिक पुरावे आणि सरकारी पक्षाच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात आली.


अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२, कंधार मा. श्री. कुलकर्णी यांनी सत्र प्रकरण क्रमांक 06/2024 मध्ये निकाल देताना आरोपी नृसिंह बालाजी केंद्रे याला भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली.


प्रकरणानुसार, 24 ऑक्टोबर 2023 रोजी मध्यरात्री बेलवाडी शिवार (ता. कंधार) येथे कौटुंबिक कारणावरून आरोपीने आपल्या आईवर लोखंडी कत्तीने वार करून गंभीर जखमी केले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी बालाजी एकनाथराव केंद्रे यांच्या तक्रारीवरून माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 161/2023 दाखल करण्यात आला होता.



या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी केला. तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय अहवाल, शस्त्र जप्ती, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच परिस्थितीजन्य व वैज्ञानिक पुरावे संकलित करून विहित मुदतीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेले सर्व पुरावे ग्राह्य धरत आरोपीला दोषी ठरविले. या खटल्यात सहायक सरकारी अभियोक्ता (AGP) श्री. कागणे यांनी प्रभावी युक्तिवाद करत साक्षीदारांची सखोल तपासणी केली. त्यांना पोलीस उपनिरीक्षक नईम खान तसेच माळाकोळी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार गंभीर गुन्ह्यांच्या खटल्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘ट्रायल मॉनिटरिंग सेल’ मुळे अशा प्रकरणांमध्ये प्रभावी न्यायालयीन पाठपुरावा होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या निकालामुळे गंभीर गुन्हे करणाऱ्यांवर कायद्याचा कठोर वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश समाजात गेला असून, माळाकोळी पोलिसांच्या तपासाची आणि सरकारी पक्षाच्या प्रभावी मांडणीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

