नांदेड | रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नांदेड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महात्मा फुले प्राथमिक व हायस्कूल येथे झाला. ‘सुरक्षित राहा – सर्वांसाठी रस्ता सुरक्षा’ या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे आणि अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याच्या प्रकारांना आळा घालणे हा आहे.


यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी 18 वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, अन्यथा संबंधित पालकांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा दिला. रस्ते अपघात टाळण्यासाठी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यप्राशन करून वाहन न चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न घेणे, चुकीच्या दिशेने वाहन न चालविणे आणि वाहतूक सिग्नलचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.



अजय शिंदे यांनी नारायणा स्कूल येथे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी शक्यतो सायकलचा वापर करावा आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक नियमांची माहिती घेऊन वाहन चालवावे, असे आवाहन त्यांनी केले.




21 ते 28 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील 28 शाळांमध्ये रिक्षाचालकांसाठी रस्ता सुरक्षा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणातून सुरक्षित वाहनचालना, वाहतूक नियमांचे पालन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास वाहतूक पोलीस अधिकारी, सेफर इंडियन रोड्स संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी वाहतूक पोलीस विभाग आणि सेफर इंडियन रोड्स अँटी करप्शन टीमने सहकार्य केले.

