नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णूपुरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत ३०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.


महाविद्यालय व रुग्णालय परिसरात सागवान, जांभूळ, कडुलिंब, पिंपळ, चिंच, आवळा, जांब, हिरडा आदी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. ‘एक झाड लावूया, पर्यावरण वाचवूया’ हा संदेश देत वृक्षारोपणासोबतच लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.


अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी निरोगी व समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याची चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. परिसर अधिक हिरवागार व प्रदूषणमुक्त करण्यासाठी भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.




या उपक्रमात वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, निवासी डॉक्टर, पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

