Dr. Sanvi Jethwani : तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व कधी? — डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत
नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी नाव न आल्याने डॉ. सान्वी जेठवाणी यांची नाराजी
नांदेड| राज्यातील समाजासाठी गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.


नांदेड महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपल्या नावाचा विचार न झाल्याने डॉ. सान्वी जेठवाणी यांनी खंत व्यक्त केली आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका असतानाही तृतीयपंथी समाजाला अद्याप राजकीय स्तरावर योग्य संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

डॉ. सान्वी जेठवाणी या सह-उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण मंडळ, अध्यक्ष – सप्तसतरंग सेवाभावी संस्था, नांदेड, तसेच PRO – इंटरनॅशनल किन्नर अखाडा या पदांवर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यासोबतच त्या एक सांस्कृतिक कार्यकर्त्या, लावणी नृत्यांगना, प्लस साईज मॉडेल तसेच तृतीयपंथी समाजातून मिस प्लस साईज इंडिया हा किताब मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्ती म्हणूनही ओळखल्या जातात.


पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही आपल्या नावाचा विचार झाला नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. जेठवाणी या नांदेड जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक आणि तृतीयपंथी समाजाच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

त्यांनी खा. अशोकरावजी चव्हाण आणि खा. अजित गोपछडे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून, कोणतीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता नांदेडमधील निवडणुकीच्या काळात पक्षासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली व काम केले.
त्या यापूर्वी भारत निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) राज्य आयकॉन म्हणून कार्यरत होत्या. त्या काळात त्यांनी मतदार जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत विविध मतदार जागरूकता शिबिरे, युवकांसोबत संवाद कार्यक्रम आणि जनजागृती मोहिमा आयोजित केल्या. समाजातील विविध घटकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले.
याशिवाय त्यांनी नांदेड तसेच राज्याबाहेरही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून युवकांसाठी युवा शिबिरे, एकात्मता रॅली, रक्तदान शिबिरे यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शासनाच्या विविध उपक्रमांमध्येही त्या सक्रिय सहभागी राहिल्या असून नांदेडमध्ये आयोजित अनेक सरकारी व सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांनी तृतीयपंथी समाजाच्या सक्षमीकरणासाठी विविध पातळ्यांवर महत्त्वपूर्ण काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या तृतीयपंथी धोरण २०२४ तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या असून राज्यातील तृतीयपंथी व्यक्तींना शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याच्या संधी मिळाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील पहिला तृतीयपंथी सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनू’ आयोजित करण्यात आला. तसेच त्या सध्या चार तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारीही सांभाळत आहेत.
डॉ. जेठवाणी यांनी देश-विदेशात विविध सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन केले असून २०१७ पासून त्यांच्या संस्थेमार्फत अनेक आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले आहेत. तृतीयपंथी समाजासाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विविध प्रकल्पांवरही त्या काम करत आहेत.
या सर्व सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा विधानपरिषद-राज्यसभा यांसारख्या मंचांवर तृतीयपंथी समाजाला प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
“आज देशात आणि जगभरात तृतीयपंथी समाजाला विविध स्तरांवर संधी दिली जात आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमध्येही क्विअर प्रतिनिधीला राज्यसभेत संधी देण्यात आली. अशा पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात आणि राजकारणात तृतीयपंथी समाजाला न्याय कधी मिळणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तृतीयपंथी समाजातील सक्षम आणि समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना राजकीय प्रक्रियेत स्थान दिल्यास तो एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
नांदेड महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाल्यास तृतीयपंथी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शहराच्या सामाजिक विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करता आले असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भविष्यात पक्ष नेतृत्व तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधित्वाचा विचार करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.



