Friday, May 29

Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी

हिमायतनगर, अनिल मादसवार | शहरातून जाणाऱ्या भोकर–हिमायतनगर–किनवट राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे गेट परिसरातील सिमेंट रस्त्याचे तब्बल चार वर्षांपासून रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अर्धवट अवस्थेतील रस्ता, खोल खड्डे व साचलेली खडी यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात घडले होते. वाहनचालक, पादचारी तसेच शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.

रेल्वे गेटपासून तहसील कार्यालय, पंचायत समिती व न्यायालयाकडे जाणारा हा प्रमुख मार्ग असल्याने दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य तर उन्हाळ्यात धुळीचे लोट उडत असल्याने व्यापारी व रहिवासी त्रस्त झाले होते. वारंवार निवेदने, आंदोलने व मागण्या करूनही कामाला गती मिळत नव्हती.

IMG 20260222 162534 Railway Get Road work : चार वर्षांची रखडपट्टी संपली; रेल्वे गेट परिसरातील रस्त्याच्या कामाला वेग, उड्डाणपुलाची जोरदार मागणी
Oplus_16908288

अखेर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली आहे. सध्या रस्त्याचे मजबुतीकरण व सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून, यावेळी दर्जेदार व टिकाऊ काम व्हावे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. निश्चित मुदतीत काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे. उड्डाणपूल झाल्यास प्रवासी नागरिकांची होणारी अडचण कायमची दूर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

निकृष्ट कामामुळे पुन्हा कटकट निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने कामावर बारकाईने लक्ष ठेवावे आणि गुणवत्तापूर्ण काम करून शहरवासीयांची वर्षानुवर्षांची समस्या कायमची सोडवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!