Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

हिमायतनगर, अनिल मादसवार| महावितरणच्या गलथान, बेजबाबदार आणि ग्राहकविरोधी कारभाराचा आणखी एक संतापजनक प्रकार हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथे उघडकीस आला आहे. मीटर पूर्णपणे बंद (Faulty) असतानाही एका गरीब महिलेला तब्बल ₹55,300/- चे वीजबिल पाठवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.


आंदेगाव येथील सविता विश्वनाथ उपलवाड या गरीब महिला ग्राहक असून, त्यांच्या घरातील वीजमीटर अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. मात्र असे असतानाही जानेवारी 2026 महिन्यासाठी ₹55,300/- इतके अवाजवी वीजबिल महावितरणने पाठवले आहे. विशेष म्हणजे, बिलावरच “Meter Status : Faulty” असा स्पष्ट उल्लेख असताना इतका प्रचंड वीज वापर दाखवण्यात आल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरत आहे.

मीटर बंद असल्यामुळे प्रत्यक्षात कोणताही वीजवापर होत नसताना, मागील रीडिंगच्या अंदाजावर (Average Billing) किंवा पूर्णतः चुकीच्या पद्धतीने बिल आकारण्यात आल्याचा गंभीर आरोप होत आहे. उपलवाड कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, एवढी मोठी रक्कम भरणे त्यांना अशक्य आहे.


या अन्यायाविरोधात संबंधित महिलेनं महावितरण कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. उलट, बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस दिल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब महिलेला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

गरीब व सर्वसामान्य ग्राहकांना वेठीस धरून चुकीची बिले देणे, वेळेवर मीटर दुरुस्ती न करणे, तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष करणे हा महावितरणचा नेहमीचाच अनुभव असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे आंदेगावसह परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून सदर ₹55 हजारांचे चुकीचे बिल रद्द करावे, मीटरची तांत्रिक तपासणी करून योग्य व न्याय प्राप्त बिल आकारावे तसेच गरीब महिलेला न्याय द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हिमायतनगर शहर व तालुक्यातील अनेक वीजग्राहकांना अशाच प्रकारच्या चुकीच्या मीटर रीडिंग व अवाजवी बिलांचा सामना करावा लागत असून, गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी महावितरणने ठोस निर्णय घ्यावा, अशी तीव्र मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिक महावितरण विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.



