Maharashtra’s Chitrarath : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला देशात प्रथम क्रमांक

नवी दिल्ली| देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने देशभरात अव्वल स्थान पटकावले आहे. राज्यांच्या चित्ररथांच्या गटात महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra’s Chitrarath) सर्वोत्कृष्ट ठरल्याची अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली आहे. या स्पर्धेत जम्मू-काश्मीरला द्वितीय तर केरळला तृतीय क्रमांक मिळाला आहे.


यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथातून गणेशोत्सवाची सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक परंपरा प्रभावीपणे मांडण्यात आली. सार्वजनिक सहभाग, रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेचा संदेश या सादरीकरणातून ठळकपणे दिसून आला.


चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांनी कर्तव्यपथावर उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या देखण्या आणि आशयपूर्ण सादरीकरणामुळे परीक्षकांनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक बहाल केला.



दरम्यान, इतर विभागांमध्येही उत्कृष्ट सादरीकरणांची दखल घेण्यात आली. सैन्य दलांच्या गटातून भारतीय नौदल, तर निमलष्करी दलांमधून दिल्ली पोलीस यांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. केंद्रीय मंत्रालयांच्या गटात सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला, तर केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘वंदे मातरम्’ नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.




