महाराष्ट्र

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश – NNL

खते, बियाण्यांचे लिंकिंग करणाऱ्या विक्रेते, कंपन्यांवर कठोर कारवाई करावी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला खरिपाचा आढावा

मुंबई| राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीच्या मदतीचे वाटप दि. ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. खते, बियाणे याचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्यांबरोबरच कंपन्यावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या.

सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या बैठकीत राज्यातील खरिपाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे -पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही.राधा, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, शेतकरी देशाचा कणा आहे. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. राज्य शासन शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगतानाच बांबू लागवड क्षेत्राची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या भागात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, असे तालुके, जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी. आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीयस्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. हवामान विभागाने जुलै महिन्यात ‘ला निना’मुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.

खरिपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे, खते व अन्य कृषी निविष्ठांचा तुटवडा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे. मात्र साठेबाजी किंवा लिंकिंग होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्स अपद्वारे ९८२२४४६६५५ या क्रमांकावर करावी, असे आवाहन कृषी मंत्री श्री.मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले.

यंदा खरिपाचे लागवडीखालील अपेक्षित क्षेत्र १४२.३८ लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिकाखाली ४०.२० लाख हेक्टर, सोयाबीन पिकाखाली ५०.८६ लाख हेक्टर, भात पिकाखाली १५.३०लाख हेक्टर, मका पिकाखाली ९.८० लाख हेक्टर, कडधान्य पिकाखाली १७.७३ लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे. राज्यात २४.९१ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून १.५० लाख टन युरिया व २५ हजार टन डीएपी खतांचा संरक्षित साठा करण्यात आल्याची माहिती, प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली.

कृषी विभागामार्फत नियंत्रण कक्ष कार्यान्वित
राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यातील खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत, गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४००० क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल. ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर आपल्या संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात. शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!