हिमायतनगर, अनिल मादसवार| “लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही वेळप्रसंगी जेल भोगली, चांगल्या कामाला नेहमीच प्राधान्य दिले हीच शिवसेनेची परंपरा आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे सकारात्मक, लोकाभिमुख काम करणारे आम्ही शिवसैनिक आहोत,” असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाठ यांनी केले.



मंगळवार, दि. २५ रोजी रात्री ८ वाजता परमेश्वर मंदिराच्या प्रांगणात हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांच्या समर्थनार्थ ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पुढे बोलताना ना. शिरसाठ म्हणाले कि, “राम ठाकरे हे गेली ३० वर्षांपासून निष्ठेने शिवसेनेचे काम करणारे, लोकांमध्ये मिसळून काम करणारे कार्यकर्ते आहेत. अशा निष्ठावंत शिवसैनिकाला मतांच्या रूपाने बळ द्या. विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. शिवसेनेला दिलेले मत म्हणजे विकासाला दिलेले मत आहे, हे आपण लक्षात ठेवावे,” असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.


व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शिवसेनेचे माजी खासदार तथा विधान परिषदेचे आमदार हेमंतभाऊ पाटील म्हणाले, “गेली ३० वर्ष भगवी पताका खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या राम ठाकरे यांना शिवसेनेने दिलेली उमेदवारी ही त्यांच्या निष्ठेची पावती आहे. शिवसेनेने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. आम्ही नेहमी लोकांचे प्रश्न शासन दरबारी नेऊन सोडवले आणि यापुढेही हेच काम अधिक जोमाने करू,” अशी ग्वाही त्यांनी दिली. “आपण सुजाण मतदार आहात. शिवसेनेच्या मागे भक्कम ताकद उभी करा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातांना बळ द्या,” असेही त्यांनी नमूद केले.
या सभेला आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, ज्येष्ठ नेते अशोक पटवर्धन, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सुदर्शन पाटील मनूलेकर यांनी तर उपस्थित मतदार बांधवांचे आभार प्रदर्शन रामभाऊ ठाकरे यांनी केले.



सभेत मार्गदर्शन करताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी थेट भाजपवर गंभीर आरोप करत जोरदार प्रहार केला. “युती तुटण्यास भाजपच कारणीभूत असून, भाजपने पाठीत खंजीर खुपसला!” — असा थेट आरोप करत त्यांनी सभेत मोठी खळबळ उडवली.

